

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लैंगिक अत्याचार, खंडणी आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये अटक असलेल्या भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावरील नाशिकमधील बँक लॉकरवर ईडीने छापा टाकत कोट्यवधींचे घबाड जप्त केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने या कारवाईत तब्बल १.१० कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, ५ हजार ५०० अमेरिकन डॉलर्स तसेच सुमारे १.८९ लाख रुपयांचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
या कारवाईनंतर अशोक खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारांतही मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी लॉकरमधील मौल्यवान वस्तूंची तपशीलवार नोंद घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक, नाशिक पोलिस आणि ईडी संयुक्तपणे करीत आहेत. तपासादरम्यान अशोक खरातच्या नियंत्रणाखालील तब्बल ६० बँक खात्यांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. अनुयायांना धार्मिक आणि आध्यात्मिक वस्तू अवाजवी दराने विकणे, भीती दाखवून खंडणी उकळणे तसेच विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणात पैसा जमा केल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे.
खरात सध्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडे सातत्याने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असल्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडत आहे. आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.
खरातवर १६ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. खरात हा १८ मार्चपासून पोलिस कोठडीत आहे. सध्या शिर्डी पोलिसांकडे त्याचा ताबा आहे. तेथील भूखंड बळकावल्याप्रकरणी तसेच समता पतसंस्थेमध्ये बनावट खाते उघडल्याप्रकरणी असे दोन गुन्हे त्याच्यावर शिर्डीत दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात त्याची पत्नी कल्पना खरातही आरोपी आहे. ती सध्या फरार आहे. यासाठी पथक तिचा शोध घेत आहे.