

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मळा तलावातील प्रदूषणामुळे झालेल्या मासळी मृत झाल्याप्रकरणाच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायायाच्या गोवा खंडपीठाने मांडवी नदी पात्रातील जलप्रदूषणची दखल घेतली. या नदी पात्रात असलेल्या कॅसिनोजवळील तसेच पुलाच्या परिसरातील पाण्याच्या गुणात्मक व परिणात्मकतेचा नव्याने अभ्यास करून त्याचा अहवाल जूनच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले.
गोवा खंडपीठाने मळा तलावातील मासळी मृत्यूप्रकरणी स्वेच्छा जनहित याचिका घेतली आहे. त्याचा विस्तार करत मांडवी नदीतील प्रदूषित पाण्याचीही दखल घेतली. नदीतील पाण्यामधील फेकल कॉलिफॉर्मचे, प्रमाण अधिक असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता.
त्यामुळे गोवा खंडपीठाने मळा प्रकरणाबरोबर मांडवी नदीतील इफ्पी जेटी येथून कॅसिनो व पुलाच्या परिसरातील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना सांगितले आहे. पर्यटन व्यावसायिकतेसाठी ज्या ठिकाणी मांडवी नदीत तरंगते कॅसिनो किंवा मरिन क्राफ्ट उभे करून ठेवण्यात आले आहेत, त्या सभोवतीच्या पाण्याचे नमुने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने घ्यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.