

नाशिक : खुशी गोराडे
गेल्या काही वर्षांत ड्रॅगन फ्रूट लागवडीबाबत शेतकऱ्यांत जागरूकता वाढल्याने या पिकात वाढ झाली आहे. पूर्वी या फळाच्या लागवडीविषयी माहिती कमी असल्याने मोजकेच शेतकरी हे पीक घेत होते. मात्र, आता अधिकाधिक शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळत असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बाजारातील आवक आणि दरावर झाला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटचे दर कमी झाले असून, हे फळ सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये येऊ लागले आहे. शरदचंद्र पवार मार्केटमध्ये दररोज अंदाज ३ ते ४ टन ड्रॅगन फ्रूट येत आहे. सुमारे ७०० ते १००० क्रेट्स फळांची बाजारात नोंद होते. निफाड, दिंडोरी या भागांतूनही ड्रॅगन फ्रूटची आवक होत आहे.
मागील वर्षी ड्रॅगन फ्रूटला १२० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. यंदा उत्पादन वाढल्याने मालाच्या गुणवत्तेनुसार ४० ते ८० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. सरासरी घाऊक दर ६५ रुपये प्रतिकिलो आहे. किरकोळ बाजारात गुणवत्तेनुसार १०० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
लाल ड्रॅगन फ्रूटला ग्राहकांकडून पसंती मिळत असून, पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटची मागणी तुलनेने कमी आहे. ड्रॅगन फ्रूट हे पौष्टिक फळ मानले जाते. यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. लागवडीनंतर १८ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर उत्पादन सुरू होते. योग्य व्यवस्थापन आणि लागवडीच्या पद्धतीनुसार काही ठिकाणी उत्पादन तुलनेने लवकर सुरू होते.
तालुक्यातील एरंडगाव येथे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत मशागत करताना महिला.
पूर्वी ड्रॅगन फ्रूट महाग असल्याने नेहमी खरेदी करता येत नव्हते. आता किंमत कमी झाल्यामुळे घरासाठी अधूनमधून हे फळ घेणे परवडते.
— नम्रता बारे, ग्राहक
पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. माझ्या तीन एकरांत एक टन उत्पादन काढले असून, पुढील काळात आणखी चार ते पाच टन उत्पादन अपेक्षित आहे. एकरी पाच लाख रुपये खर्च आला.
— रमेश पाटील, उत्पादक
यंदा उत्पादन वाढल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत बाजारभाव कमी झाले आहेत. चांगल्या दर्जाच्या लाल ड्रॅगन फ्रूटला ग्राहकांकडून अधिक मागणी आहे.
— रोहित गुप्ता, घाऊक व्यापारी
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा ड्रॅगन फ्रूटचे दर कमी झाले आहेत. लाल ड्रॅगन फ्रूटला ग्राहकांची अधिक पसंती असून, दररोज सुमारे २० ते २५ किलो विक्री होते.
— किशोर बोरकर, फळविक्रेता