

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांना डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि. २०) रात्री उशिरा राहत्या घरातून अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती डॉ. निलेश जेजूरकर यांना यापूर्वीच अटक झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतरच्या चौकशीत डॉ. निलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यात पूर्वीपासून प्रेमसंबंध व नियमित संपर्क असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
डॉ. चव्हाण या जेजूरकर यांच्या घरी वारंवार येत असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. जानेवारी २०२६ मध्ये डॉ. चव्हाण यांनी मनीषा जेजूरकर यांना फोन करून अपमानास्पद शब्दांत मानसिक त्रास दिल्याचा आरोप असून, त्या संभाषणाची ध्वनीफीत पोलिसांनी न्यायालयात सादर केल्याचे सांगण्यात आले.
मनीषा यांच्या मृत्यूला सुरुवातीला आत्महत्येचे स्वरूप दिसत असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. दोरी अडकविलेल्या खिडकीची रचना, तसेच शवविच्छेदन अहवालात फेरफार झाल्याची शक्यता याबाबतही न्यायालयात प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी डॉ. चव्हाण यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. स्वाती चव्हाण या जिल्हा रुग्णालयातील जबाबदार पदावर कार्यरत असल्याने त्यांच्या अटकेनंतर प्रशासकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्यास नियमानुसार निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. पुरावे, फोन संपर्क, संभाषण आणि इतर बाबींच्या आधारे तपास पुढे नेला जात असून, पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाबही नोंदविले जात आहेत.