

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्गच्या डबलबारी भजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध बुवा, कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे रहिवासी बुवा समीर रामा कदम (४१) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
टी-२० या डबलबारी व तिरंगी भजन सामन्यांसाठी ते विशेषतः तरूणाईमध्ये प्रसिद्ध होते. आपल्या पहाडी आवाजाने त्यांनी अनेक भजन सामने गाजविले होते. गीतकार, संगीतकार, गायक आणि बतावणी अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी भजन क्षेत्रात केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
समीर कदम हे गेले काही महिने आजारी होते. श्री. लिंग-रवळनाथ प्रासादिक भजन मंड, पोखरण या भजनी मंडळाच्या माध्यमातून ते भजन सादर करायचे. भजनसम्राट काशिराम परब व बुवा सुशील गोठणकर यांच्याकडे त्यांनी भजन व संगीत कलेचे धडे घेतले. त्यांनी आपल्या गायन कलेची सुरूवात ऑर्केस्ट्रामधून केली.
किशोर कुमार, उदित नारायण, कुमार सानू अशा विख्यात गायकांची गाणी ते गायचे. त्यानंतर ते भजन क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यातील विविध भजन स्पर्धांमध्येही सांघिक व वैयक्तिक बक्षिसे पटकावली.
नवोदित भजनी आणि दशावतारी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात आघाडीवर असणारे कुडाळच्या लाजरी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर यांनी कदम यांचे टॅलेंट ओळखून त्यांना टी-२० डबलबारी भजनात प्रथम संधी दिली. त्यानंतर कदम यांनी मागे वळून पाहिले नाही. सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, गोवा आधी भागात त्यांनी अनेक डबलबारी, तिरंगी भजन सामने गाजवले.
प्रसिद्ध भजनी बुवा गुंडू सावंत, संदीप लोके, विनोद चव्हाण, संदीप पुजारे, दिनेश वागदेकर, उदय पारकर, वैभव सावंत आदी अनेक बुवांसोबतचे त्यांचे डबलबारी सामने गाजले. मुंबईस्थित गीतकार राजा दळवी यांची अनेक गाणी त्यांनी गायिली होती. कदम हे स्वतःही उत्कृष्ट गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक स्वरचित गौळणी, गजर रचिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील भीम गीतांमध्येही त्यांची मास्टरी होती.
त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला. त्यांची यू-ट्यूबवरील भजने, डबलबारी सामने यांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. गोड गळ्याच्या भावपूर्ण गायकीने ते रसिकांना मंत्रमुग्ध करायचे. त्यांच्या जाण्याने एका पहाडी आवाजाचा भजनी बुवा हरपल्याची भावना भजन क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, बहीण, भावोजी, काका, पुतणे असा परिवार आहे.