

Kudal MIDC Mixer Truck Accident
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी परिसरातील महानंदा पशुखाद्य कारखान्याच्या वजन काट्यासमोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी (दि.२०) सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिक्सर ट्रक एमआयडीसी परिसरातून कुडाळच्या दिशेने येत होता. महानंदा पशुखाद्य कारखान्याजवळील वजन काट्यासमोरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगत पलटी झाला. या अपघातात चालक केबिनमध्ये अडकून पडला.
दुर्घटनेत चालकाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीचीही कोंडी झाली. या अपघाताची नोंद कुडाळ पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.