

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणात बुधवारी (दि. ३०) न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. निकाल जाहीर होण्याची अपेक्षा असताना, न्यायालयाने आरोपीला शिक्षेपूर्वी आपले म्हणणे मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आता या खटल्यातील शिक्षा दि. ७ ऑक्टोबर रोजी सुनावली जाणार आहे.
विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ॲड. निकम यांनी आरोप सिद्ध झाल्याची माहिती दिली. शिक्षेपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेण्याची प्रक्रिया न्यायालयाकडून पूर्ण केली जाणार आहे.
सरकार पक्षाने आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, तुरुंगातील वर्तन, मानसोपचार तज्ज्ञांकडून करण्यात आलेली तपासणी याबाबत न्यायालयात स्वतंत्र अर्ज सादर केला आहे. या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी, तुरुंग अधिकारी आणि परिविक्षा अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती ॲड. निकम यांनी दिली.
डोंगराळे येथे दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने २४ साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद दि. २१ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने ३० सप्टेंबर निकालाची तारीख निश्चित केली होती.
मंत्री भुसे न्यायालयात:
डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी न्यायालयात उपस्थिती लावली. ते सकाळी ११ वाजता न्यायालयात दाखल झाले. या प्रकरणाचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता मंत्री भुसे यांनाही होती.
"आरोपीची घरची परिस्थिती, पूर्वेतिहास काय आहे, अटक झाल्यानंतर तुरुंगात त्याची वागणूक कशी होती, त्याची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच आरोपीला कोणती शिक्षा मागावी, याबाबत न्यायालयाकडे विनंती करता येईल."
- ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील