

Washim Malegaon Highway Robbery
वाशिम : वाशिम-मालेगाव मार्गावरील सांवरगाव बर्डे गावाजवळ ट्रक अडवून चालक आणि क्लीनरला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. अजय हरिभाऊ चव्हाण (वय २२) आणि आशिष नारायण चव्हाण (वय २७, दोघेही रा. वाशिम) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे या रोड रॉबरीमागील इतर आरोपींचाही शोध लागण्याची शक्यता आहे.
२९ जुलै २०२४ रोजी रात्री ट्रक चालक रुपसींग नारायणसिंग राजपूत (वय ३५, रा. लाखाखेडी नहारपूर, ता. महिदपूर, जि. उज्जैन, मध्य प्रदेश) हे माल घेऊन वाशिम-मालेगाव मार्गाने जात होते. सांवरगाव बर्डे गावाजवळ तीन ते चार अज्ञात इसमांनी त्यांचा ट्रक अडविला. यावेळी आरोपींनी राजपूत आणि क्लीनरला मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून क्लीनरजवळील ५ हजार रुपये रोख आणि १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला.
या प्रकरणी रुपसींग राजपूत यांच्या फिर्यादीवरून वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात अप. क्र. ३२४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांनी पथकाला आवश्यक सूचना देत तपासाला सुरुवात केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासासोबतच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. या तपासादरम्यान अजय हरिभाऊ चव्हाण आणि आशिष नारायण चव्हाण यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या आदेशाने, अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलिस हवालदार गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, गजानन गोटे तसेच पोलिस कॉन्स्टेबल अमोल इरतकर आणि दीपक घुगे यांनी सहभाग घेतला.