

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्यात ३ एप्रिलला दिंडोरी परिसरात घडलेल्या विहीर अपघात प्रकरणात दिंडोरी पोलिसांनी नगरपंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ठेकेदार मानसी निरगुडे यांना पोलिसांनी अटक केली. संबंधित प्रशासकीय अधिकारी फरार असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या महिन्यात ३ एप्रिलला क्लासचे गॅदरिंग आटोपून कारने घरी परतत असताना कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून ६ विद्यार्थ्यांसह इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता.
या प्रकरणी पोलिसांनी विहीरमालक राजेंद्र राजे व कारचालक सुनील दरगोडे यांच्यासह काही संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता. राजे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारचालक, विहीरमालकासह तत्कालीन मुख्याधिकारी नागेश येवले, तत्कालीन अभियंता सुनील पाटील, ठेकेदार मानसी निरगुडे, तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तत्कालीन भूकरमापक तसेच काम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या अभियंत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या रस्त्याचे काम करताना अडथळा ठरणारी विहीर सुरक्षितपणे बुजवणे किंवा संरक्षक भिंत उभारणे, सूचनाफलक लावणे, गतिरोधक बसवण्यात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
अहवालानंतर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले होते. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ठेकेदार मानसी निरगुडे यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.