

DGP Nagar takes action against 30 encroachments
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पूर्व विभागातील वडाळा शिवारात डीजीपीनगर रस्त्यालगत असलेल्या ३० अनधिकृत दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जेसीबी फिरवला. या सर्व पत्राशेडची बांधकामे महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतरीत्या उभारण्यात आली होती, असे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सांगण्यात आले.
डीजीपीनगर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पत्राशेडच्या माध्यमातून दुकाने, गॅरेजेस, फर्निचर कारखाने उभे राहिले होते. महापालिकेची परवानगी न घेता सदर अतिक्रमणे उभारली गेली होती. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या पथकाने कारवाई करत ही दुकाने हटविली.
सकाळी दहापासूनच पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सदर कारवाईला दुकानदारांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महापलिकेने मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशांनुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपआयुक्त (अति.) सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभाग विभागीय अधिकारी चंदन घुगे, इंदिरानगर पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनगर पोलिस निरीक्षक भरत शिरसाठ, उपअभियंता, नगर नियोजन विभाग सोनवणे, प्रवीण थोरात, नीलेश साळी, खेमचंद पवार आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात ३० दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले.
दरम्यान, ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना असतील त्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावे अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.