Maharashtra Rain Update | पावसाचा जोर ओसरला तरी कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती कायम, जाणून घ्या राज्यातील कोणते मार्ग बंद, कोणते सुरु?

धरणांतून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे
कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका कायम आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका कायम आहे.(Source- @Info_Kolhapur)
Published on
Updated on

Maharashtra Rain Update

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. धरणांतून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूर, सांगली आणि नाशिकमधील अद्याप पुराचा धोका कमी झालेला नाही. कोल्हापूरमधील पंचगंगा नदी धोका पातळीवर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पाणी पातळी ४२ फूट ११ इंचावर होती. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट समजली जाते. ही धोका पातळी गाठण्यास केवळ एक इंच कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली आहेत.

धरणांतून होत असलेला विसर्ग

राधानगरी - 4,356 क्युसेक

दूधगंगा - 18,600 क्युसेक

वारणा - 15,369 क्युसेक

कोयना - 82,100 क्युसेक

अलमट्टी - 25,0000 क्युसेक

हिप्परगी - 18,0250 क्युसेक

कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडी आणि केर्ले येथे पाणी

कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रजपुतवाडी आणि केर्ले येथे पाणी वाढल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शिवाजी पूल येथील सर्व वाहतूक बंद करून वाठार मार्गे वळवण्यात आली आहे. प्रयाग चिखली येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका कायम आहे.
kolhapur Flood : बॅरिकेट्स तोडून ट्रक घातला पुराच्या पाण्यात अन् ट्रक झाला पलटी...

कोल्हापूर - गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला

कोल्हापूर - गगनबावडा या मार्गावर आलेले पुराचे पाणी कमी झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. याबाबतची माहिती कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी दिली आहे.

चिखली येथील पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

करवीर तालुक्यातील चिखली येथील पूरग्रस्त नागरिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे, अशी माहिती करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे रात्रभर पूरग्रस्त नागरिकांच्या मदत आणि बचाव कार्यात उतरले.

कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका कायम आहे.
kolhapur | खाकी वर्दीमधील देवदूत धावले; गर्भवतीची पुरातून सुखरूप सुटका

सांगलीत कृष्णेची पाणी पातळी 42.5 फुटावर

कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून सुरू असणारा विसर्ग 95 हजार 300 क्युसेकवरून 82 हजार 100 वर आणण्यात आला आहे. यामुळे सांगलीत कृष्णेची पाणीपातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे. सांगलीत कृष्णेची पाणी पातळी 42.5 फुटावर असून सांगलीच्या विस्तारित भागातील घरे पाण्याखाली गेली आहेत.

उजनी धरणातून 1 लाख 31 हजार 600 क्युसेकने विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात एक लाख 31 हजार 600 क्यूसेकने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणाच्या साखळीतील वरील धरणे भरली असल्याने आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस झाल्याने या धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे उजनी धरणातदेखील पावणेदोन लाख क्युसेकने पाण्याचा प्रवाह येत आहे.

उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता 123 टीएमसी असून सध्या उजनी धरणात 118 टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातूनदेखील पूर परस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भीमा नदी पात्रात मोठा विसर्ग केला जात आहे.

पुण्यातील एकता नगरीतील पाणी ओसरले

पुण्यातील एकता नगरीतील जलपूजन आणि सरोवर, द्वारका सोसायटीतील पाणी ओसरले आहे. खडकवासल्यातून चाळीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला तर आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. पुण्यातील एकता नगरीमध्ये महापालिकेची यंत्रणा तीन दिवसापासून सज्ज असून परिस्थिती नियंत्रणात आहे. महापालिकेकडून पाण्याचे टँकर, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांसाठी मदत केंद्र 24 तास सुरू आहे.

गोदावरी पात्राबाहेर, पूरसदृश्य स्थिती कायम

नाशिकमधील गोदावरीचे पाणी नदीपात्राबाहेर आल्याने रामकुंड परिसरातील अनेक दुकाने आणि हॉटेल पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झाली आहे. रामकुंड परिसरात असलेल्या रस्त्यांवर पाणी आले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी गोदावरी नदीची पूरसदृश्य स्थिती कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news