

देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील हौसन रोडवर काम सुरू असल्याने ठेकेदाराने बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर ठेवल्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दखल घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा संघटना मुस्लीम आघाडी प्रदेशाध्यक्ष राशिद सय्यद व शेख फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष जहांगीर शेख यांनी केली आहे.
वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम सुरू असून, या कामी ठेकेदाराने बांधकामाचे साहित्य थेट सार्वजनिक रस्त्यावर मांडून रस्त्याची अडवणूक केली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरच ठेकेदाराने सीमेंट, रेती, खडी, विटा आदी बांधकाम साहित्य ठेवले आहे. शिवाय कॅन्टोन्मेंट हद्दीतील भिंत तोडून काम सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू असल्याने नागरिकांना बाजारपेठेत जाण्या-येण्याचा रस्ता अडवण्यात आला आहे.
याबाबत प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी व कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्याकडून दंड वसूल करावा, तसेच रस्त्यावरील बांधकाम साहित्य त्वरित हटवण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना रस्त्याचा वापर करताना कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, अशी मागणी राशिद सय्यद, जहांगीर शेख यांच्यासह नागरिकांनीवि वाहनधारकांनी केली आहे.