

पंचवटी : पी. डी. गोणारकर
नैसर्गिक समतोल राखला जावा. तसेच मुंबई-आग्रा उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेमध्ये सौंदर्यीकरण असावे. जेणेकरून प्रवास करताना नागरिकांना आल्हाददायक चित्र निर्माण होईल, अशा उद्देशाने निर्माण केलेल्या बागांचे रूपांतर समन्वयाअभावी वाळवंटात होताना दिसत आहे. महामार्ग विभागाशी या संदर्भात संपर्क साधला असता ठेकेदार बदलला आहे, असे सरकारी उत्तर देण्यात आले. त्यामुळे आता ठेकेदार कधी नेमला जाणार आणि बागा पुन्हा हिरवळीने कधी बहरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक शहरातील गोविंदनगर ते जत्रा चौफुलीपर्यंत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालील सेमी गार्डन एकेकाळी नाशिककरांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. हिरवेगार वृक्ष, बहरलेली फुलझाडे, सुबक लॉन आणि सजावटीच्या कुंड्यांमुळे या परिसराने शहराच्या सौंदर्यात भर घातली होती. मात्र, सध्या या बागा पाण्याअभावी व देखभालीअभावी वाळत चालल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
सुमारे सात किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाखाली अवैध पार्किंग, कचरा व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वृक्षारोपण व सौंदर्यीकरण करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाच्या भिंती रंगविण्यात आल्या, आकर्षक रोपे लावण्यात आली आणि प्रकाशयोजनाही करण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा शहराच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी कॉलेज, जुना आडगाव नाका, के. के. वाघ परिसर, अमृतधाम, बळी मंदिर, हनुमाननगर तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक (जत्रा चौफुली) येथील बागांमधील झाडे, फुलझाडे व लॉन हळूहळू वाळू लागले आहेत. लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे नियमित पाण्याअभावी व निगा न राखल्याने कोमेजत असून, अनेक ठिकाणी गवत वाळून माती उघडी पडली आहे.
या बागेची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते. मात्र कंत्राटदार बदल, जबाबदारीत टाळाटाळ आणि प्रशासनातील दुर्लक्ष यामुळे बागांची हेळसांड होत आहे. शहर सुशोभीकरणासाठी खर्च होणारा पैसा जर योग्य देखभालीअभावी वाया जात असेल, तर याला जबाबदार कोण, असा सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या या बागा पुन्हा हिरव्यागार व्हाव्या, यासाठी तातडीने पाणीपुरवठा, देखभाल आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा काही महिन्यांत नयनरम्य बागा पूर्णतः ओसाड होण्याची भीती व्यक्त होत आहे.
झाडांना व फुलझाडांना जगविण्यासाठी वेळेवर पाणी देणे, नियमित साफसफाई करणे आणि निगा राखणे अत्यावश्यक आहे. मात्र, हे काहीही न करता स्मार्ट सिटीच्या केवळ गप्पा मारणारे नेमके कुठे आहेत? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या विषयाकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी.
सुनील जाधव, महानगर संघटक, शिवसेना ठाकरे गट
बागेच्या देखभालीचे काम बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून, त्यासाठी एक हॉर्टिकल्चर तज्ज्ञही नियुक्त करण्यात आला आहे. येत्या एक महिन्यात नागरिकांना सकारात्मक बदल दिसून येईल. यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
शशांक आडके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक