Swine Flu And Dengue Cases | शहरात 590 घरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती!

Swine Flu And Dengue Cases | गणेशोत्सवाच्या तोंडावर साथरोगांचा कहर
Swine Flu And Dengue Cases
Swine Flu And Dengue CasesPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या तोंडावर नाशिक शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या डेंग्यू जनजागरण मोहिमेअंतर्गत घरोघरी करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल ५९० घरांमधील पाणीसाठ्यात डेंग्यू आजारास कारणीभूत डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे.

Swine Flu And Dengue Cases
Nashik Police | नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 402 उपद्रवींवर हद्दपारीचा बडगा

दरम्यान, सप्टेंबरच्या अवघ्या ११ दिवसांत स्वाइन फ्लूचे तब्बल ८४ नवे रुग्ण आढळले असून, शहरातील बाधितांची संख्या आता २३१ वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महापालिका हद्दीतील दोघांचा, तर ग्रामीण भागातील तिघांचा समावेश आहे. दुसरीकडे, सप्टेंबरच्या पहिल्या ११ दिवसांत डेंग्यूचेही ३० नवे रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या १३१ झाली आहे.
पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर ऐन सणासुदीच्या काळात डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश आजारांबरोबरच स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत शहरात स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण आढळले होते.

मात्र, जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संसर्गाचा वेग वाढला. जुलैमध्ये २१, ऑगस्टमध्ये तब्बल ११९ आणि सप्टेंबरच्या पहिल्या ११ दिवसांत ८४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे वर्षातील स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा २३१ वर पोहोचला आहे. स्वाइन फ्लू हा एच१ एन१ इन्फ्लुएंझा विषाणूमुळे होणारा श्‍वसनाचा आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे त्याचा संसर्ग वेगाने होतो. हवामानातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि पावसाळी वातावरणात संसर्गाचा धोका वाढतो.

डेंग्यूचेही १३१ रुग्ण

स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत डेंग्यूचे ५६ रुग्ण होते. ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात ४५ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर सप्टेंबरच्या अवघ्या ११ दिवसांत आणखी ३० रुग्णांची भर पडली. त्यामुळे डेंग्यूबाधितांचा आकडा १३१ वर पोहोचला आहे.

Swine Flu And Dengue Cases
Nashik-Pune railway highway |नाशिक-पुणे रेल्वे महामार्ग वादात भुजबळांची उडी

२० हजार घरांची तपासणी

८३ वैद्यकीय पथकांमार्फत आतापर्यंत तब्बल २० हजार घरांना भेटी देऊन सुमारे ८३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५६ तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, पथकांनी शहरातील २८ हजार पाणीसाठ्यांची तपासणी केली. यावेळी तब्बल ५९० ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. अळ्यांची उत्पत्ती आढळलेल्या ठिकाणी संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होणार असल्याने साथरोगांचा संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया आणि मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरभेटी, तापरुग्णांची तपासणी, पाणीसाठ्यांची पाहणी आणि डासांच्या उत्पत्तीस्थळांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news