

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा जपतानाच संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करण्यासाठी संविधानदिनी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यातील ११ ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान' या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचा जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कापशीबारी मैदानावर होणार आहे.
सकाळी ७.३० वाजता किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले जाईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन अभियान' अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
'मानाचा मुजरा, हटवू या कचरा' ही संकल्पना घेऊन सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि गडप्रेमींच्या सहभागातून किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनस्थळांवरील स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि पर्यटन विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभागांसह विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
एमपीसीबीच्या नाशिक उपप्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले यांनी समाजकल्याण विभाग, पर्यटन संचालनालय, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग तसेच विविध सामाजिक संस्था आणि गडप्रेमी संघटनांना निमंत्रित केले आहे. संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
साल्हेर किल्ल्यावर सकाळी साडेसातला स्वच्छता मोहिमेस सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता कापशीबारी मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, संविधान पालनाची शपथ आणि गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन अभियानाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय पर्यावरण आणि संविधानविषयक जनजागृती, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.