

Committee formed for Simhastha land acquisition
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम, मिसिंग लिंक, पुलासाठी पोहोच रस्ते, राम काल पथ आदींच्या भूसंपादनाकरिता जमीनमालकांशी चर्चा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या नगरनियोजन विभागाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यानिमित्त रस्ते, पूल आदी विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. रिंगरोडची मिसिंग लिंक जोडली जाणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे.
याशिवाय पुलांसाठी पोहोच रस्ते, जलशुद्धीकरण केंद्रे, वाहनतळ, मलनिःसारण केंद्र व इतर प्रकल्पांसाठी तसेच राम काल पथ प्रकल्पासाठी देखील भूसंपादन केले जाणार आहे. या भूसंपादन प्रकरणामध्ये शासन निर्देशांनुसार जमीनमालकांना महापालिकेच्या माध्यमातून मोबदला अदा करण्यात येतो. सदर भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येतात. अथवा महापालिकेमार्फत थेट वाटाघाटीने संपादनाची देखील तरतूद आहे.