

नाशिक : प्रयागराजचा कुंभमेळा १५ हजार हेक्टरवर होतो. नाशिकमध्ये मात्र अवघ्या ३५० एकरांत कुंभमेळा भरवला जातो. तपोवनातील ही जागाही मिळाली नाही, तर कुंभमेळा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित करत साधुग्रामच्या आरक्षित जागेतील वृक्षतोडीचे राजकीयीकरण अयोग्य आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, सेलिब्रेटींसह या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रोहित पवार यांना सुनावले आहे. धर्माला अफूची गोळी म्हणणारेच या आंदोलनस्थळी दिसत असल्याची जळजळीत टीकाही फडणवीस यांनी केल्यामुळे वृक्षतोडविरोधातील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, वृक्षतोड टाळली पाहिजे याविषयी कुणाचे दुमत असू शकत नाही. मात्र याचे राजकीयीकरण चुकीचे आहे. साधुग्रामसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणे योग्य नाही, असे लोकांना वाटणे साहजिक आहे. मात्र ही झाडे तोडली नाही, तर साधुग्राम उभारणार कोठे? या विवंचनेत प्रशासन आहे. कारण प्रयागराजचा कुंभमेळा १५ हजार हेक्टर क्षेत्रावर होतो. नाशिकमध्ये मात्र अवघ्या ३५० एकरांत कुंभमेळा भरवावा लागतो. तेथील जमीन मिळाली नाही, तर कुंभमेळा होणार कसा? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
कुंभमेळा आपल्या सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. सनातन संस्कृतीत वृक्षांना, नदीला विशेष महत्त्व आहे. आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत म्हणून लोकांनाही वाटते कुंभमेळ्यासाठी वृक्ष कशाला तोडायचे त्यांची ही भूमिकाही योग्य आहे, असे नमूद करत यात मधला मार्ग काढावा लागेल. जागाही वापरता यावी पण जेवढे वृक्ष वाचवता येतील तेवढे वाचवले पाहिजे. काही वृक्ष पुनर्लागवड करावे लागले, तर ते केले पाहिजे. यासंदर्भात आपण स्थानिक प्रशासनाची चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
विचार न करता वृक्षलागवड
तपोवनातील जागा कित्येक वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित आहे. या जागेची सन २०१५-२०१६ ची गुगल इमेज बघितली, तर त्या ठिकाणी कुठलीही झाडे नव्हती. अतिक्रमण होऊ नये यासाठी २०१७-१८ मध्ये महापालिकेने या जागेवर विचार न करता वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला. हे चूक आहे असे म्हणता येणार नाही. परंतु परत १२ वर्षांनी ही जागा साधुग्रामसाठी वापरावी लागणार आहे, याचा विचार न करता या जागेवर अतिघन पद्धतीने वृक्षलागवड केली गेली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.