नाशिक : सिंहस्थासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली १ हजार ८२५ झाडे तोडण्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. नाशिककर नागरिक, पर्यावरणप्रेमी, सेलिब्रेटींसह शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शवित सरकारवर निशाणा साधल्यानंतरही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे वृक्षतोडीवर ठाम राहिल्याने भाजपच्या स्थानिक आमदारांना मात्र, चांगलाच घाम फुटला आहे. वृक्षतोडीला वाढता विरोध अर्थात जनमत विरोधात जाण्याची भीती आमदारांना सतावू लागली आहे. तर वृक्षतोडीसारख्या ज्वलंत प्रश्नावर आमदारांनी साधलेली चुप्पी नाशिककरांच्या मनात संशयाचे वावटळ निर्माण करणारी ठरली आहे.
नाशिकमधील तपोवन परिसरात साधुग्राम उभारणीच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक वरुण सुखराज यांच्यासह सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटींनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. सोशल मीडियावर ‘तपोवन वाचवा’ चळवळ तीव्र बनली आहे. भाकप, माकपसह आता शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठींबा देत राज्यातील भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
ज्योर्तिमठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी तर या वृक्षतोडीला विरोध दर्शविताना या वृक्षतोडीमुळे कुंभमेळ्याच्या आनंदाला गालबोट लागण्याची भीती व्यक्त केल्याने नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर पोहोचला आहे. त्यातच तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर दिल्लीतील भारत मंडपच्या धर्तीवर एक्झिबिशन सेंटर उभारण्याची महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेली निविदा प्रक्रिया ही वृक्षतोड साधुग्रामसाठी नव्हे तर, एक्झिबिशन सेंटरच्या ठेकेदारासाठी असल्याचा संशय बळावणारी ठरल्याने नाशिकमधील वृक्षतोडीविरोधातील हे आंदोलन अधिकच चिघळले आहे. वाढता विरोध लक्षात घेता तपोवनातील २०१५ पूर्वीची जुनी झाडे तोडली जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने देत पर्यावरणप्रेमींचा राग काहीसा शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी साधुग्रामसाठी वृक्षतोड क्रमप्राप्त असल्याचे सांगून पर्यावरणप्रेमींचा राग ओढवून घेतला आहे. या संपूर्ण आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत मात्र नाशिकमधील भाजपच्या तिन्ही आमदारांची भूमिका समोर येऊ शकलेली नाही. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि मक्तेदार या मुद्यावरून महापालिका प्रशासनाला जाब विचारणाऱ्या आमदारांनी या वृक्षतोडीबाबत बाळगलेले मौन नाशिककरांची अस्वस्थता वाढविणारे ठरले आहे. त्यामुळे आमदार या मुद्यावरून चुप्पी तोडणार कधी, असा सवाल आता सर्वसामान्य नाशिककरांकडून केला जात आहे.
ही जागा साधूग्रामसाठी राखीव आहे. विरोधकांकडून राईचा पर्वत केला जात आहे. सिंहस्थासाठी काही झाड तोडावी लागतील. त्याबदल्यात १५ हजार झाडांच्या लागवडीचे काम सुरू झाले आहे.
गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री.
तपोवनातील वृक्षतोडीबाबत लोकांची भूमिका प्रशासनाने समजून घ्यावी. चर्चेतून मार्ग काढावा. साधुग्रामच्या जागेवर एक्झिबिशन सेंटर उभारण्याविषयी माहिती नाही.
प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य.