

नाशिक : तपोवन परिसर केवळ धार्मिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक भाग नसून, नैसर्गिक वारसा आहे. याठिकाणी हिरवाई, मोठी-जुनी झाडे, झुडपे, वेली असून, त्यावर असंख्य पक्षी, किटक, सरपटणारे प्राणी यासर्वांचे वास्तव्य आहे. हे सर्व मिळून तपोवनाची जैवविविधता निर्माण करीत असून, शहराचे पर्यावरण अबाधित ठेवण्यास मदत करीत आहेत. नेचर क्लब आॅफ नाशिक या संस्थेतर्फे रविवारी (दि. ३०) तपोवनात राबविलेल्या 'चला, तपोवनात पक्षी जीवन बघू' या उपक्रमाअंतर्गत तब्बल ५२ जातींचे पक्षी याठिकाणी वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.
या उपक्रमात चारशेपेक्षा अधिक नाशिककरांनी सहभाग नोंदवित या पक्ष्यांचे दिनक्रमाचे निरीक्षण केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी उपक्रमात सहभागींना पक्ष्यांची माहिती दिली. तपोवनातील झाडे शहराचे 'थर्मल बफर' असून, ते वृक्ष तोडल्यास जैवविविधतेचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या पक्ष्यांचा निवास वाचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पक्षीमित्र सतीश गोगटे यांनी, वृक्ष आणि फुलपाखरांचे महत्त्व सांगत शहराचा 'एअर क्वॉलिटी इंडेक्स' अबाधित ठेवण्यासाठी तपोवनातील झाडे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पक्षीमित्र अण्णा देशमाने यांनी सापांविषयी माहिती दिली.
माजी उपमहापौर मनीष बस्ते यांनी, साधुग्रामसाठी पर्यायी विचार करण्याची गरज असून, वृक्षतोड पूर्णत: चुकीचे आहे. या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ वृक्ष अभ्यासक प्रमोद फाल्गुने यांनी, वृक्ष लागवड कुठे कुठे केली, याबाबत प्रशासनाला जाब विचारण्याची गरज असल्याचे म्हटले. पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी, नागरिकांनी दबावगट निर्माण करून हे वृक्ष वाचविण्यासाठी साखळी उपोषण सुरूच ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आकाश पाटील यांनी पोवाडा सादर करीत, उपस्थितांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती केली. तर तन्मय टकले यांनी वातावरणात होत असलेल्या बदलाविषयी सांगितले.
उपक्रमात ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, अमित कुलकर्णी, रोषण केदार, रवींद्र वामनाचार्य, डॉ. सीमा पाटील, डॉ. जयंत फुलकर, संजना काजवे, प्रमिला पाटील, दर्शन घुगे, आशिष बनकर, नितेश पिंगळे, योगेश रोकडे, भीमराव राजोळे, प्रमिला पाटील, भाऊसाहेब राजोळे, मनोज वाघमारे, सर्पमित्र विशाल बाफना, आनंद रॉय, पार्वती पटेल, मंजुषा पत्की, मिलिंद पत्की आदी उपस्थित होते.
या पक्ष्यांचा आहे अधिवास
सकाळी सात वाजेच्या सुमारासच राबविलेल्या या निरीक्षण उपक्रमात कोकीळा, हरियल, तांबट, शिक्रा, स्वर्गीय, नर्तक, किंगफिशर, सनबर्ड, चष्मेवाला, बुलबुल, वेडाराखू, रामगंगा, वटवट्या आदींसह हिरवट पर्णवटवट्या, श्वेतकंठी वटवट्या, मलबारी मैना, टिकेल निळा माशिमार, लाल कंठाचा माशिमार, काळा थिरथिरा हे स्थलांतरीत पक्षी देखील दिसून आले. या पक्ष्यांची याठिकाणी घरटी असून, त्यांनी तपोवनालाच आपले आश्रयस्थान बनविले आहे.