नाशिक : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढल्यापूसन ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे. विशेषत: राज्याचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ वारंवार नाराजी बोलून दाखवित आहेत. बुधवारी (दि.१०) मुंबई येथे झालेल्या ओबीसी समाज उपसमितीच्या बैठकीतही भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली. (Latest Nashik News)
मात्र, बैठकीनंतर मंत्री भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी एकाच विमानाने मुंबई-नाशिक प्रवास केल्याने, मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची नाराजी तर दूर केली नाही ना? अशी चर्चा आता रंगत आहे.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र देण्याच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने लागोलाग अध्यादेश देखील काढला आहे. पण या अध्यादेशाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तीव्र विरोध करीत आहेत. भुजबळांनी या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्याची देखील तयारी सुरू केली आहे. लवकरच ते न्यायालयात अध्यादेशाविरोधात याचिका दाखल करणार आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी समाज उपसमितीच्या बैठकीत मंत्री भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, राज्यात ओबीसी-मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असतानाच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री भुजबळ यांनी मुंबई-नाशिक विमानाने एकत्र प्रवास केला. सीपीआरआय लॅबच्या उद्घाटनासाठी दोन्ही नेते मुंबईहून एकाच विमानाने नाशिकला पोहोचले. दोन नेत्यांचा एकत्र प्रवास ही महत्त्वाची घडामोड मानली जात असून, मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची नाराजी तर दूर केली नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. तर मराठा समाजाच्या नेत्यांकडून देखील या प्रवासाबाबत मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत.
सीपीआरआय लॅबच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी भुजबळांच्या बाजुने बोलावे काय?' असे म्हणत उपस्थितांना एकच धक्का दिला. मुख्यमंत्री जेव्हा भाषणासाठी व्यासपीठाच्या एका बाजुला असलेल्या पोडियमसमोर उभे राहिले, तेव्हा माध्यमांच्या कॅमेरा प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरील दुसऱ्या बाजुने असलेल्या पोडियमसमोर उभे राहण्याची विनंती केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी, 'मी भुजबळांच्या बाजुने बोलावे, असे तुम्हाला वाटते काय?' असे म्हटले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.