

Case registered against father for sexually abusing minor girl
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करून तिला सात आठवड्यांची गर्भवती करणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या अतिसंवेदनशील गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील संशयित आरोपी पित्याचा खरा चेहरा समोर आणला आहे.
गेल्या ६ ऑगस्टला गंगापूर पोलिस ठाण्यात अल्पवयिन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने, तिला आईने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तिच्या तपासण्या केल्यानंतर ती सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने, डॉक्टरांनी याबाबतची माहिती गंगापूर पोलिस ठाण्यात दिली.
त्यावरून पीडित मुलीने (१७ वर्षे) दिलेल्या जबाबावरून फिर्यादी आईने अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदविली होती. गुन्ह्यातील आरोपीबाबत आई व पीडित मुलीकडे पोलिसांनी चौकशी केली असता, दोघीही उडवाउडवीचे उत्तरे देत होत्या. तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करीत होत्या. त्यामुळे कुठलीही माहिती पोलिसांना प्राप्त होत नव्हती. दोघीही माहिती लपवित असल्याचा संशय पोलिसांना सातत्याने येत होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसेच तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पूनम पाटील, प्रियंका कवाद यांनी दोन तपास पथके तयार केली. तपास अधिकारी पूनम पाटील यांनी पीडिताचे व गर्भाचे डीएनए सॅम्पल घेऊन रासायनिक तपासणीकरिता पाठविले. गुन्हे शोध पथकाचे मोतीलाल पाटील व त्यांच्या टीमने १०० हून अधिक लोकांकडून माहिती गोळा करून तपास सुरू केला. परंतु कुठलीही ठोस माहिती मिळत नव्हती.
त्याच वेळी पीडिताची आई वारंवार मूळगावी जात असल्याने, सरतेशेवटी संशयाची सूई पीडितेच्या वडिलांवर आली. त्यामुळे तपास अधिकारी पूनम पाटील यांनी पीडितेच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेऊन रासायनिक तपासणीकरिता पाठविले. डीएनए सॅम्पल तपासणीत पीडितेच्या वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचर केल्यामुळे ती गर्भवती राहिल्याचा अहवाल न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून झाल्यानंतर या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा पीडितेचा बापच असल्याचे समोर आले.