

येवला : पुढारी वृत्तसेवा
चांगली समाजनिर्मिती ही कार्याची प्रेरणा ठेवून समाजातील व्यथा दूर करण्याचे काम अनुलोमच्या माध्यमातून करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येवला तालुक्यात वडगाव बल्हे येथील अनुगामी लोकराज्य अभियानाच्या वतीने 'कापसे फाउंडेशन अनुलोम संगम २०२६'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, पद्मश्री दादा लाड, अतुल वझे, अनुलोम प्रमुख स्वानंद ओक, सुजाता मराठे, अंबादास जोशी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्त्वाची आहे.
अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून स्वामी विवेकानंदांच्या संदेशाला अनुसरून काम करीत आहेत. ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. अनुलोमने प्रगतिशील समाजामध्ये उभे केलेले कार्य महत्त्वाचे आहे.
उत्तम, सुंदर आणि बहुमोल कार्य अनुलोमच्या माध्यमातून होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत नेतृत्व तयार करण्याचे क्षेत्र अनुलोमने निवडले आहे. आज देश वेगाने प्रगती करत असताना यापुढील काळातही अनुलोमने राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे आणि समरसतेसाठीचे काम अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज भेदभावरहित असेल, एकजूट समाजाची निर्मिती करताना या कार्यात ५०० महिला स्वयंसेवकांचा सहभाग हे समरसतेचेच उदाहरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समर्पणाची भावना असेल तरच अनुलोमचे काम करता येणे शक्य आहे. त्यामुळेच यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे महत्त्व आहे. हा परिवार मोठा होत गेला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
स्वागतपर प्रास्ताविक स्वानंद ओक यांनी केले. यावेळी पद्मश्री दादा लाड आणि कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनुलोमच्या कामात योगदान देणाऱ्या जनसेवकांचा करण्यात आला.
दिव्यांग कर्मचाऱ्यांनी विणले मुख्यमंत्र्यांचे चित्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापसे पैठणी उत्पादन कक्षाला भेट दिली. यावेळी कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कापसे पैठणी उद्योगसमूहात काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी हातमागावर मुख्यमंत्र्यांचे चित्र विणले.
स्वतः मुख्यमंत्री यांनी हातमाग यंत्रावर बसून स्वतःचे चित्र न्याहाळले. अनुलोमच्या कार्यक्रमात हेच हातमागावरील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असलेले चित्र कापसे यांनी भेट दिले.