नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बनावट पावतीपुस्तके तयार करून त्या आधारे बाजार फीची रक्कम वसूल करणाऱ्या बाजार समितीच्या लिपिकाने सुमारे ९० लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रकाश निवृत्ती घोलप (रा. गोकुळनंदन कॉलनी, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहेत, तर संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव हा या समितीमध्ये लिपिक म्हणून काम करीत आहे. जाधवने दि. १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपिक या पदावर काम करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दप्तरात फेरफार करून बनावट पावतीपुस्तके तयारी केली होती. त्यानंतर त्याने या पुस्तकांच्या आधारे बाजार समितीच्या गेटमधून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांकडून फीची सुमारे ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांची रक्कम वसूल केली. मात्र, त्याने ही सर्व रक्कम बाजार समितीच्या बँक खात्यात जमा न करता, स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून अपहार केला. तसेच आपल्या पदाचा गैरवापर करून बाजार समितीची फसवणूक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सुनील जाधव विरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक पडोळकर अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा –