Chandwad Onion Protest 2026 | कांदा प्रश्नावर चांदवड पेटले! बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे 'आमरण उपोषण' सुरू

Chandwad Onion Protest 2026 | बाजारभाव घसरल्याने शेतकरी आक्रमक; मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार
Onion Prices Drop
कांदा दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंताpudhari news network
Published on
Updated on

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपये इतके घसरल्याने शेतकरी आक्रमक झाला असून, कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार रुपये बाजारभाव आणि कमी दराने विक्री झालेल्या कांद्यास १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान राज्य सरकारने तत्काळ द्यावे, या मागणीसाठी शेतकरी एकवटला आहे.

Onion Prices Drop
IIT Goa Campus News | आयआयटी गोवाच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी हालचालींना वेग! सरकारने 'या' 3 जागा केल्या निश्चित

चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवार (दि. २३) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला तालुक्यातील शेतकरी तसेच विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाल्याने उपोषण अधिक तीव्र झाले आहे.

कांद्यासह मक्याच्या बाजारभावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी व वाहतूक खर्च प्रचंड वाढले असताना, शेतमालाचे दर मात्र कोसळल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा लिलावादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले.

बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकत्र जमले होते. लिलाव प्रक्रियेविरोधात नाराजी व्यक्त करत संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बाजार समितीच्या आवारातच आमरण उपोषण सुरू केले.
“शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “जय जवान, जय किसान” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आमरण उपोषणात
डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, नितीन आहेर, विलास भवर, संपतराव वक्टे, डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. शामराव जाधव, विजय जाधव, सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे, वाल्मिक वानखेडे, अनिल पाटील, पुंडलिक गुंजाळ, समाधान जामदार आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.

Onion Prices Drop
Lasalgaon Onion News: कांदा उत्पादकांना केंद्राचा धक्का! निर्यात प्रोत्साहनात मोठी कपात; बाजारभाव घसरणार?

या आहेत प्रमुख मागण्या

  • कांद्याला प्रति क्विंटल किमान ३ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा.

  • आतापर्यंत कमी दराने विक्री झालेल्या तसेच पुढील विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे.

  • गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून खरेदी केलेल्या मक्याचे थकीत पेमेंट तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे.

  • मका हमीभाव खरेदी केंद्राची खरेदी मर्यादा वाढवून खरेदी प्रक्रियेला गती द्यावी.

“बियाणे, रासायनिक खते, औषधे, मजुरी यांचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज काढून शेती करीत आहे. मात्र जेव्हा शेतमाल विक्रीला येतो, तेव्हा बाजारभाव कोसळलेले असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती एक रुपयाही उरत नाही.”

— संजय जाधव, माजी सभापती, कृ.उ.बा.

“देशात पिकवलेला कांदा देशातच विक्री होत असल्याने कांद्यासह सर्वच शेतमालाचे बाजारभाव कोसळले आहेत. आज उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठीच हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.”

— विलास भवर, तालुकाप्रमुख, शिवसेना

“गेल्या एक महिन्यापासून कांद्यासह मका, सोयाबीन पिकांचे दर घसरले आहेत. आज शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च चारपट वाढला आहे. त्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार रुपये दर मिळावा आणि कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.”

— डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news