

नाशिक : भर पावसाळ्यात सिंहस्थ कामांना वेग येणार असून भाविकांच्या सुरक्षेसाठी त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या डाव्या आणि उजव्या काठावरील चंद्रघाट ते प्रयागतीर्थ यांना जोडणारा सुमारे 2.1 किलोमीटर लांबीचा घाट नव्याने बांधण्यात येणार आहे. या कामासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून साहित्य पुरवठा होण्याच्यादृष्टीने अंदाजपत्रकात दर समाविष्ट करण्यासाठी मोहोरबंद दरपत्रक मागविण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. भाविकांना पवर्णस्नान सुकर व्हावे यासाठी गोदावरी नदीच्या तीरावर चंद्रघाट ते प्रयागतीर्थ हा घाट नव्याने बांधण्यात येणार आहे. या घाटबांधणीसाठी सिमेंटचे ब्लॉक, पेव्हर ब्लॉक यासह कॉम्पेक्ट सबबेस, बेस काँक्रिटवर स्टॅम्प केलेले काँक्रिट फ्लोरींग आदी आधुनिक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. या कामाची जबाबदारी शासनाने छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नाशिकस्थित लघुपाटबंधारे विभागावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शासकीय अंदाजपत्रकात या कामाचा समावेश करण्यासाठी विभागाने दरपत्रक मागविले आहे.
हे प्रस्तावित काम कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, भाविकांच्या सुरक्षिततेसह सुविधांचा विकास करण्यासाठी घाट बांधकाम प्राधान्याने पार पाडले जाणार आहे. संबंधित साहित्याचे दर विभागाच्या निर्धारित दरसूचित नसल्याने, फक्त अंदाजपत्रक तयार करताना हे दर समाविष्ट करता यावेत, यासाठीच ही दरपत्रके मागवण्यात येत आहेत. या कामामुळे त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घाटांची सुविधा सुधारली जाणार असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी तीन प्रकारचे साहित्य मागवण्यात आले आहे.
अहिल्या घाट : हा घाट अत्यंत जुना आणि ऐतिहासिक घाट आहे. सध्या या ठिकाणी पायर्या असून, त्या पायर्यांना पारंपरिक घाटाच्या स्वरूपात रूपांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी बसाल दगडाचा वापर करण्यात येणार आहे. घाटावर उभे राहिल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताचा भास निर्माण होईल, असे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
या घाटाचेही नूतनीकरण करण्यात येणार असून, त्यासाठीही बसलचा दगड वापर होणार आहे. बांधकाम झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कृत्रिम काम वाटण्यापेक्षा पौराणिक आणि धार्मिक महत्त्व टिकविण्यासाठी हा प्रयोग करण्यात येतो आहे. त्यासाठी 12 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.