Nasik Kumbamela
Nasik Kumbamela canva image

Nasik kumbh mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकसह ५ रेल्वे स्थानकांवर १ हजार ११ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी घेतला कामांचा आढावा
Published on

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभप्रमाणेच रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी शुक्रवारी याबाबतच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, भुसावळ विभागाचे डीआरएम आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री-रेल्वे बोर्डाला कामांच्या नियोजन आणि अंमलबजावणीची माहिती दिली.

रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महाकुंभ २०२५ च्या अनुभवातून समोर आलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास सांगितले. नाशिकच्या जवळच्या सर्व स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्याच्या सूचना रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सिंहस्थ कुंभमेळा परिसराच्या क्षेत्रातील ५ महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी, कसबे-सुकेणे या स्थानकांचा समावेश आहे. या सर्व रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. या स्थानकांवरील नियोजित कामांसाठी १ हजार ११ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले.

Nasik Kumbamela
Simhastha Kumbh Mela Nashik: तपोवन भूसंपादनाबाबत आज मुंबईत बैठक

५ स्थानकांवरील पायाभूत सुविधांची कामे

नाशिक रोड: प्लॅटफॉर्म क्रमांक ४ दोन्ही बाजूंसाठी विकसीत केला जाणार. प्लॅटफॉर्म-१ चा २४ डब्यांच्या गाड्यांसाठी विस्तार केला जाईल. १२ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधला जाईल. होल्डिंग एरिया म्हणून गुड्स शेडचा वापर प्रस्तावित आहे.

देवळाली: अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधले जातील. ६ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल बांधले जातील. प्रगत कोच आणि वॅगन तपासणी सुविधा (३ स्टेबलिंग लाईन्स आणि २ पिट लाईन्ससह) बांधण्याची योजना आहे. एक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.

ओढा: लूप लाईन्ससह एक प्लॅटफॉर्म विकसित केला जाईल. ४ पादचारी पूल बांधले जातील. ५ स्टेबलिंग लाईन्स बांधण्याचे प्रस्तावित आहे.

खेरवाडी: एक नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. दोन पादचारी पूल बांधले जातील.

कसबे-सुकेणे: प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. २ पादचारी पूल बांधले जातील.

सदर कामांव्यतिरिक्त, सर्व रेल्वे स्थानकांवर विविध प्रवासी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये पाण्याच्या टाक्या, नवीन शौचालये यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. सर्व कामे २ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार आहेत. एकूण प्रस्तावित ६५ कामांपैकी ३३ कामांना आधीच मंजुरी देण्यात आली आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले.

Nasik Kumbamela
Nashik News: चेन्नई-नाशिक-सुरत महामार्गाच्या कामास गती द्या - निमा

सिंहस्थसाठी विशेष रेल्वे गाड्या

सिंहस्थासाठी ३ कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन, रेल्वे विभाग विशेष गाड्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवण्याची योजना आखत आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले. लांब पल्ल्याच्या विशेष आणि कमी अंतराच्या मेमू गाड्यांची सुविधा केली जाणार आहे. या विशेष गाड्या कामाख्या, हावडा, पटना, दिल्ली, जयपूर, बिकानेर, मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेड अशा महत्त्वाच्या स्थानकांना नाशिकशी जोडतील, असे मंत्रालयाने म्हटले. एक राउंड-ट्रिप विशेष सर्किट रेल्वे देखील चालवली जाणार आहे. ही गाडी त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वर या ३ ज्योतिर्लिंगांना जोडेल.

गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा वापर

यात्रेकरूंची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी प्रत्येक प्रमुख स्थानकावर मोठे होल्डिंग क्षेत्र विकसित केले जात आहेत. एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असेल, असे मंत्रालयाने म्हटले.

मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक होणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालय राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करत आहे. येत्या काही महिन्यांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त प्रगती आढावा बैठक घेतली जाणार आहे, असे मंत्रालयाने म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news