

लासलगाव : मध्य रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत विनातिकीट, अनधिकृत अथवा अवैध प्रवास करणाऱ्या २०.४७ लाख प्रवाशांवर कारवाई करून तब्बल १५९.३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २०.०५ लाख प्रकरणांतून ११६.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला होता. त्यामुळे यंदा दंडवसुलीत ३७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळात १०.११ लाख प्रकरणांतून ६६.९२ कोटी, भुसावळ मंडळात ३.७७ लाख प्रकरणांतून ३८.९० कोटी, पुणे मंडळात २.१३ लाख प्रकरणांतून १८.६८ कोटी, नागपूर मंडळात २.३६ लाख प्रकरणांतून १७.९३ कोटी, सोलापूर मंडळात १.१० लाख प्रकरणांतून ७.२७ कोटी, तर मुख्यालय स्तरावर ९९ हजार प्रकरणांतून ९.६३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
भुसावळ मंडळाचीही दमदार कामगिरी
भुसावळ मंडळाने सहा महिन्यांत ३.७७ लाख प्रवाशांवर कारवाई करून ३८.९० कोटी रुपयांची दंडवसुली केली. दररोज सरासरी ११,१८४ प्रवाशांवर कारवाई होत असून, ८७ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात येत आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्येच मध्य रेल्वेने २.४४ लाख प्रवाशांकडून १८.५३ कोटी रुपये दंड वसूल केला.
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी स्टेशन तपासणी, एम्बुश चेक, फोर्ट्रेस चेक आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये झाल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.