

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील १००० आश्रमशाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची पडताळणी करण्यासाठी एकाच दिवशी विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शासकीय ५००, तर अनुदानित ५५८ आश्रमशाळांचा समावेश होता. आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत पटपडताळणी मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी ३० सप्टेंबर २०२६ अखेरच्या पटसंख्येच्या अनुषंगाने विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांना भेटी देण्यासाठी तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये नियुक्त तपासणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे वर्गनिहाय व तुकडीनिहाय मोजणी केली. तसेच संबंधित विद्यार्थ्याची नोंद शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये असल्याची खात्री करण्यात आली.
मोजणीच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला उभे करून, त्याचे पूर्ण नाव विचारण्यात आले. त्यानंतर वर्ग हजेरीसमोर विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवून, नोंदवहीतील माहिती आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांची पडताळणी करण्यात आली. तसेच, तपासणीच्या वेळी शाळेतील शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक नोंदी पूर्ण करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर मार्करने निशाणी
पटपडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर निळ्या शाईच्या मार्करने निशाणी केली होती. विद्यार्थ्यांची दुबार मोजणी होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली. तसेच, मोजणीदरम्यान आढळलेल्या गैरहजर विद्यार्थ्यांची स्वतंत्र माहिती नोंदविण्यात आली.
आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला ● सर्वोच्च प्राध्यान्य आहे. विद्याथ्याना दीदार शिक्षण का आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांची अचूक पटसंख्या व प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित करणे महत्त्वाचे आहे. विशेष पटपडताळणी मोहिमेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थी नोंदींची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास आणि शैक्षणिक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होईल.
- लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)