

X-ray print on paper; How will the diagnosis be accurate?
नाशिक : सतीश डोंगरे
सोयीपेक्षा गैरसोयींमुळेच अधिक चर्चेत राहणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अजब कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागात सीटीस्कॅन आणि एक्स-रे रिपोर्ट चक्क कागदावर प्रिंट काढून रुग्णांना सोपविले जात असल्याने, प्रिंटवरून निदान करताना ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा चांगलाच कस लागत आहे. त्यातच या विभागातील डॉक्टरांचा मनमानी कारभारही रुग्णांसाठी वेदनादायी ठरत आहे.
राज्य शासनाने राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयांमधील रेडिओलॉजी विभागाची जबाबदारी आउटसोर्सिंग पद्धतीने त्रयस्थ संस्थांकडे सोपविली आहे. त्याकरिता मध्यवर्ती निविदाप्रक्रिया राबविली गेली. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाची जबाबदारी एका संस्थेकहे सोपविण्यात आली असून, त्याकरिता शासनाकडून संबंधित संस्थेला मोठा निधी दिला जातो. या संस्थेकडे सीटीस्कॅनसह एक्स-रेच्या एका विभागाची जबाबदारी आहे.
मात्र, तुलनेत रुग्णसेवेत हा विभाग अपुरा पडत असल्याने, शासनाच्या आउटसोर्सिंग हेतूवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या विभागात सीटीस्कॅन आणि एक्स-रे साठी येणाऱ्या रुग्णांना रिपोर्ट 'फिल्म'वर न देता, चक्क कागदावर प्रिंट काढून दिला जात आहे. कागदावर काळपट प्रिंट येत असल्याने, ते बघून निदान करताना ऑर्थोपेडिक डॉक्टरांचाही कस लागत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांचे निदानच होत नसल्याने, त्यांच्या वेदनांवर थातूरमातूर उपचार केले जात आहेत.
कागदावर काळपट प्रिंट येत असल्याने, निदान करताना डॉक्टरांचाही कस लागत आहे. बहुतांश रुग्णांचे निदानच होत नसल्याने, त्यांच्या वेदनांवर उपचार केले जात आहे.
रेडिओलॉजी विभागातील डॉक्टरांच्या उद्धटपणाचाही रुग्णांना सामना करावा लागत आहे. साध्या कागदावर काढून दिलेल्या एक्स रे रिपोर्टवरून निदान करताना अडचणी येतात. अशात रिपोर्टचा संगणक स्क्रीनवरून मोबाइलमध्ये फोटो काढून आणावा, असा सल्ला ऑर्थोपेडिक डॉक्टर रुग्णांना देतात. त्यानुसार सहकार्य मागणाऱ्यांशी डॉक्टर हुज्जत घालतात. बऱ्याच रुग्णांना फोटो काढू देण्यास नकार दिला जातो. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून, त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना दिलासा कमी अन् वेदनाच अधिक मिळत आहेत.
याबाबत ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी संवाद साधला असता, रिपोर्टची कागदावर प्रिंट न काढता, फिल्मवर प्रिंट काढण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. झेरॉक्स प्रिंटवरून अचूक निदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी प्राथमिक औषधोपचारावरच अधिक भर द्यावा लागतो.