

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नागरिकांमध्ये प्रशिक्षित व नोंदणीकृत फार्मासिस्ट्सच्या भूमिकेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी, तसेच सुरक्षित व जबाबदार औषध वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेतर्फे राज्यभर जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशिक्षित, नोंदणीकृत फार्मासिस्टकडूनच औषधे घ्यावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी या मोहिमेच्या माध्यमातून केले आहे.
जनजागृती मोहिमेत औषध वितरण करताना रुग्णांना योग्य मार्गदर्शन, औषधांचा योग्य डोस, संभाव्य दुष्परिणाम, औषधांमधील परस्परसंवाद तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचे महत्त्व याविषयी अतुल अहिरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. फार्मासिस्ट यांनी आपले काम करताना पांढरा ॲप्रन वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असून, रुग्णांच्या सुरक्षित उपचारात त्याची भूमिका महत्त्वाची असल्याने प्रत्येक नागरिकाने औषधे केवळ नोंदणीकृत फार्मासिस्ट्सच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत, हा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी परिषद सातत्याने जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे.
परिषदेमार्फत नागरिकांना औषधांचा जबाबदारीने वापर करणे, स्वतःहून औषधे घेण्याचे टाळणे तसेच औषधांबाबत कोणतीही शंका असल्यास आपल्या जवळच्या नोंदणीकृत फार्मासिस्टचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद भविष्यातही रुग्ण सुरक्षा, औषधांचा विवेकी वापर आणि फार्मासिस्ट व्यवसायाविषयी जनजागृती करणारे उपक्रम राबवणार असल्याचे राज्य फार्मसी परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.