

नाशिक : भर पावसातही बिर्हाड आंदोलन सुरू असून रोजंदारी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. बिर्हाड आंदोलनाचा शुक्रवार (दि. २५) पंधरावा दिवस होता.
16 जून रोजी रोजंदारी कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्यात आल्याने कामावर पुन्हा हजर राहण्याचे आदेश द्यावेत यासाठी रोजंदारी कर्मचार्यांनी आदिवासी आयुक्तालयाबाहेर बिर्हाड आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, सीटूचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले आदी प्रयत्न करीत आहेत. मात्र, शासन रोजंदारी कर्मचार्यांना हटवून बाह्यस्त्रोत्राद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यावर ठाम आहे.
आदिवासी आयुक्त लीना बनसोड आणि आंदोलकांची टीम यांच्यात अनेकवेळा चर्चेच्या फेर्या होऊनही प्रश्न सुटलेला नाही. गत आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने आंदोलकांचे मनोधैर्य उंचावले होते मात्र दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने आंदोलकांची धावपळ होत आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांसाठी आदिवासी आयुक्तालयाबाहेर रस्त्यावरच स्वयंपाक करण्यात येत असल्याने पावसादरम्यान अन्न शिजविताना व्यत्यय येत आहे. दरम्यान शासन आपल्या भुमिकेवर ठाम असल्याने पुढील काळात आंदोलन काय निर्णय घेतात हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे.