नाशिक : बिऱ्हाड आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळांनी केलेली शिष्टाई शनिवारी (दि. १२) तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीनंतर निष्फळ ठरली. आदिवासी विभागातील आश्रमशाळेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासह बाह्यस्रोताचा आदेश जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने आदिवासी विकास भवनासमोरील ठिय्या आंदोलन शनिवारी सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिले.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळेत बाह्यस्रोताद्वारे १,७९१ पदे भरली जाणार आहेत. या प्रक्रियेला आदिवासी आश्रमशाळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विरोध असून, ही भरती रद्द करून रोजंदारीवर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे आदी मागण्यांसाठी राज्य रोजंदारी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षक व कर्मचारी यांचे बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. मात्र, मागण्यांची दखल सरकारकडून घेतली जात नसल्यामुळे आक्रमक आंदोलकांनी शुक्रवारी (दि. ११) आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
आंदोलकांनी आयुक्तालयाला घेराव घालत विभागासह यंत्रणेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. १२) मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांसोबतच सहआयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त शशिकला अहिरराव, विनीता सोनवणे यांच्याशी साडेतीन तास चर्चा झाली. सोमवारी सचिवांसमवेत २५ आमदार बैठक घेणार असून, आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन झिरवाळ यांनी दिले; परंतु, जोपर्यंत लिखित स्वरूपात आदेश रद्द होत नाही, तोपर्यत येथून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे बैठक निष्फळ ठरली.
आंदोलकांनी आयुक्तालयाबाहेरच ठिय्या आंदोलन कायम ठेवल्यामुळे गडकरी चौक ते सीबीएस चौक दरम्यान रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून रस्त्यावरच पंगती उठत आहेत.
मंत्री नरहरी झिरवाळ आणि आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. सोमवारी बैठक होणार असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत बाह्यस्रोताचा आदेश रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही
ललित चौधरी, अध्यक्ष, रोजंदारी कर्मचारी संघटना