

सिडको : महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंबड पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिडको, अंबड भागातील तब्बल 87 संशयित गुन्हेगारांना तडीपार केले आहे.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली होती. त्यामध्ये ज्यांच्यावर दोनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा 25 संशयित गुन्हेगारांना सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे.
दीर्घकालीन तडीपारीबरोबरच निवडणुकीच्या शांततेत बाधा आणू शकणाऱ्या इतर 62 संशयित गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या 62 जणांना महापालिका निवडणुकीच्या मुख्य कालावधीत 15 दिवसांसाठी तडीपार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस प्रशासनाचा कडक इशारा
अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी माहिती दिली की, निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या किंवा शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तडीपार केलेल्या व्यक्तींनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सिडको परिसरातील संवेदनशील भागांत पोलिसांचे विशेष गस्त पथक तैनात करण्यात आले असून, संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्ही व पोलिस गस्तीमार्फत लक्ष ठेवले जात आहे.