

Ashok Kharat Case Update
नाशिक : दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहाव्या गुन्ह्यामध्ये आज (दि. २६) त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अशोक खरात याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, "आरोपी सध्या ज्या गुन्ह्यात अटकेत आहे, त्याचा तपास सुरू असून इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचे कनेक्शन समोर येत आहे. खरात न्यायालयीन कोठडीत असणे तपासाच्या दृष्टीने धोकादायक आहे."
खरात याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सहाव्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली असली, तरी तपास यंत्रणेने या गुन्ह्यातील आपला पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवला आहे. खरातला आता महिला अत्याचाराच्या एका वेगळ्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले जाणार आहे. त्यानुसार उद्या त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात येईल.
सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान विनंती केली की, तपासाची व्याप्ती मोठी असल्याने तपास यंत्रणेला संशयित आरोपीचा ताबा तातडीने मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असली तरी, पुढील तपासासाठी पोलीस आजच त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.