Nashik Bhagur EV charging station water ATM | भगूरला ई- चार्जिंग स्टेशन, वॉटर एटीएम उभारणार

Nashik | भगूरला ई- चार्जिंग स्टेशन, वॉटर एटीएम उभारणार, ९९.९९ लाखांचे प्रकल्प : महिला कौशल्य विकास केंद्राचाही समावेश
 EV charging station
EV charging station
Published on: 
Updated on: 

देवळाली कॅम्प/नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहराच्या विकासाला आता आधुनिकतेची जोड मिळणार आहे. भगूर नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवर ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन, महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र, सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएम तसेच व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. या विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकूण ९९ लाख ९९ हजार ८१६ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या पुढाकारातून नगर परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आली आहे.

भगूर नगर परिषदेच्या नगर भूमापन क्रमांक ९८१ मधील मालकीच्या जागेवर ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे शहरात येणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. नियमानुसार शुल्क आकारून या माध्यमातून नगर परिषदेला नियमित उत्पन्नही मिळू शकणार आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच महिलांसाठीच्या सुविधांवरही विशेष भर देण्यात आला आहे.

नगर भूमापन क्रमांक २३४/२ मधील जागेत महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र आणि सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधांच्या अंतर्गत ४९ लाख ३१ हजार ३६७ रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या केंद्रामुळे महिलांना कौशल्य विकासाच्या संधी मिळतील. स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनासाठी आवश्यक सोयी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे नागरिक आणि पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी दत्तमंदिर चौक आणि शिवाजी चौक येथे वॉटर एटीएम उभारण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरण व पर्यटनविषयक कामांसाठी ५० लाख ६८ हजार ४४९ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात क्रांती चौक येथे आकर्षक व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे.

 EV charging station
Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थ स्वागतासाठी 'नाशिक महोत्सव'

'वैशिष्ट्यपूर्ण' कामांसाठी विशेष अनुदान आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत ही कामे केली जाणार आहेत. भगूर नगर परिषद या कामांची कार्यान्वयन यंत्रणा राहणार आहे. ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणाऱ्या या विकासकामांमुळे भगूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

 EV charging station
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवकपद निवडणूक; काँग्रेसने दाखल केलेला अकरावा अर्ज छाननी समितीतून अधिकृतपणे फेटाळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.