

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बोलविण्यात आलेली बैठक मंगळवारी (दि.१२) ऐनवेळी रद्द करण्यात आली असून, या बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चौकशीसाठी मंत्रालयात गेलेले महापालिकेचे वैद्यकीय पथक माघारी फिरले आहे.
बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी असलेल्या गोविंदनगर स्थित मालती आयव्हीएफ केंद्राचा या प्रकरणात मुख्य सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये देखील आढळण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने मालती आयव्हीएफ केंद्र सील करत कागदपत्रे ताब्यात घेतली असून, या केंद्राची मान्यतादेखील रद्द केली आहे.
शासनाच्या निर्देशांनुसार शहरातील सर्व २४ आयव्हीएफ केंद्रांची तसेच ४२७सोनोग्राफी केंद्रांची तपासणीदेखील करण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिकसह ठाणे महापालिकेचे अधिकारी, बदलापूर पोलिस तसेच आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.१२) मंत्रालयात पाचारण करण्यात आले होते. मात्र, ही बैठक ऐनवेळी रद्द झाली असून, बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.