

नाशिक : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ व सिद्धपुरुष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात कथित अश्लील व्हिडिओंचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्स, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसह विविध देशांमध्ये झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सायबर पोलिसांनी या प्रकरणात तब्बल ७४ टेलिग्राम गट व विविध सोशल मीडिया खाती शोधून काढली आहेत. या माध्यमांतून व्हिडिओंची विक्री व प्रसार सुरू असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे काही गटांकडून संबंधित व्हिडिओंच्या क्लिप अवघ्या २० रुपयांमध्ये विकल्या जात असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. या क्लिप्ससाठी ऑनलाइन व्यवहार करण्यात येत असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात सायबर पोलिसांनी ११ सोशल मीडिया मध्यस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. विविध प्लॅटफॉर्मवरील २५ खात्यांकडून प्रतिसाद प्राप्त झाला असून, एका संशयित व्यक्तीची ओळख पटली आहे. त्याची पडताळणी व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित खाती आणि गटांचे प्रशासक, तसेच सामग्री अपलोड व प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.
तपासादरम्यान आतापर्यंत ४०६ आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि छायाचित्रे हटवण्यात आली आहेत. संबंधित सामग्री भारतातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्येही प्रसारित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिक गंभीर झाले असून, तपास यंत्रणांनी विविध राज्यांतील सायबर विभागांशी समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, अशोक खरातविरोधात महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. महिलांना दैवी शक्तीची भीती दाखवून, गुंगीचे औषध किंवा अंमली पदार्थ देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
नाशिक पोलिसांनी खरातच्या कार्यालयासह फार्म हाउसवर टाकलेल्या छाप्यादरम्यान महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे दर्शविणारे १०० हून अधिक व्हिडिओ जप्त केले होते. या व्हिडिओंचे वर्गीकरण, त्यामधील व्यक्तींची ओळख आणि त्यांचा प्रसार कशा पद्धतीने झाला याचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत असून, व्हिडिओंच्या प्रसारामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी सायबर पोलिसांकडून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड, खरेदी किंवा पुढे पाठवू नयेत तसेच संबंधित लिंक, गट किंवा खाते आढळल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे. अशा सामग्रीचा प्रसार करणे हेदेखील कायद्याने गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.