

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरात याच्यावर महिला लैंगिक शोषण तसेच फसवणुकीचे गंभीर आरोप असून, या प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. विविध भागांतून पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदविल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. त्याच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा यासाठी 'एसआयटी'ची स्थापना करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. सुरुवातीला हिमांशू बंगल्यातून तपास सुरू करण्यात आला होता, मात्र तपासाची गोपनीयता राखण्यासाठी नंतर एसआयटीचे कार्यालय महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे स्थलांतरित करण्यात आले.
सध्या अशोक खरात एसआयटीच्या ताब्यात असून, न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत त्याच्याकडून अधिकाधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आतापर्यंत त्याच्या विरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण आठ गुन्हे दाखल असून, काही दिवसांत आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्लास्टिकचा साप जप्त
घरात प्लास्टिकचा साप दाखवून धार्मिक विधी करीत असे. याबाबत अनेक चर्चा झाली होती. या संबंधित जादूटोणा अंतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसआयटी टीमने अखेर हा प्लास्टिकचा वीस फुटी साप जप्त केला आहे.