

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला भोंदूद्याबा अशोक खरात याची कोठडीत अचानक प्रकृती खालावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असताना मंगळवारी (दि. २१) सकाळच्या सुमारास त्याला मळमळ, उलट्या, तीव्र डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने कार्डियाक अॅम्बुलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक तपासणी करून त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच खरात याच्या वकिलांनी न्यायालयात त्याला न्यूरोलॉजिकल त्रास असल्याचे सांगत न्यूरोसर्जनकडे उपचारासाठी हलवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच त्याची प्रकृती अचानक खालावल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, सध्या कडक पोलिस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांकडून त्याच्या आरोग्याबाबत सतत निरीक्षण केले जात आहे.
आपल्या जीवनामध्ये अत्यंत विलासी आयुष्य जगणारा भोंदू अशोक खरात हा तपास पथकासमोर अतिशय हतबल झाला आहे. रोज सुरू असलेल्या अर्धा तास चौकशीमध्ये खरात दबावात असल्याचे दिसत आहे. मागेच त्याने आपले मरण आता इथेच आहे, अशीसुद्धा शंका उपस्थित केली होती. त्याचे वजन जवळपास आठ किलो कमी झाले आहे. दरम्यान, एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी पथक सक्रिय झाले असून, संबंधित कागदपत्रांची छाननी सुरू आहे. अशोक खरात गेल्या सुमारे ३५ दिवसांपासून पोलिस कोठडीत असून, आतापर्यंत त्याला १२ वेळा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याच्यावर एकूण १८ गुन्हे दाखल असून, काही प्रकरणांत न्यायालयीन, तर काहींमध्ये पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रकृती बिघडल्याने चौकशीवर परिणाम
खरातची सध्याची पोलिस कोठडी गुरुवारी (दि. २३) संपणार असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी तपासाच्या अनुषंगाने कोठडी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. तपासाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरच त्याची प्रकृती बिघडल्याने चौकशीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.