

लासलगाव : आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली ‘करणीबाधा’ची भीती दाखवून एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणात लासलगाव पोलिस ठाण्यात भोंदू बाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नाशिक भागात वास्तव्यास असून ती एका खासगी ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करते. काही काळापासून कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे ती त्रस्त होती. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला धारणगाव खडक येथील मंदिरात नेले होते. याच ठिकाणी महेशगिरी उर्फ काकडे याने तुझ्यावर करणीबाधा आहे असे सांगत पीडिता व तिच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण केली. या भीतीचा गैरफायदा घेत उपचारांच्या नावाखाली त्याने संबंधित महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भीतीपोटी काही काळ गप्प राहिल्यानंतर पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) कडे मदत मागितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करत आहेत.
आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, तसेच त्याचे इतर साथीदार आहेत का, याचा तपासही सुरू आहे. दरम्यान, अशा भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी न पडता अंधश्रद्धेपासून दूर राहावे, तसेच अशा प्रकारच्या घटनांबाबत नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.