

नाशिक : राज्य सरकारने कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा फटका शहरी तसेच गावखेड्यातील असंख्य छोटे व्यापारी, महिलांद्वारे चालविले जाणारे गृहउद्योग, विक्रेते आणि सजावट व्यावसायिक, विधवा, निराधार महिलांसह लाखो कारागीरांना बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत उगविणाऱ्या फुलांव्यतिरिक्त इतर कृत्रिम फुलांना परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा मंडप डेकोरेटर्स, फ्लॉवर डेकोरेटर्स ॲण्ड इव्हेंट असोसिएशनच्यावतीने शहरातील सर्व आमदारांना करण्यात आली.
आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, सरोज अहिरे तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांना असोसिएशनने निवेदन देत आमचा आवाज सरकार दरबारी मांडावा अशी साद घालण्यात आली. यावेळी दोन्ही असोसिएशनच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले, कृत्रिम फुलांचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
मात्र, महाराष्ट्राच्या मातीत पिकणाऱ्या झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंती, निशीगंधा, जरबेरा, निजली, गेलडा, मखबल, कामिनी, जिप्सो या फुलांव्यतिरिक्त इतर कृत्रिम फुलांच्या वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. आजमितीस या व्यवसायात लाखो कामगार महिला, लघु उद्योजक कार्यरत आहेत. विक्री आणि सजावट करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे सरकारने घेतलेल्या बंदीच्या निर्णयाचा समाजातील या घटकाला मोठा फटका बसणार आहे. विशेषत: लग्नसमारंभ, कौटुंबिक सोहळे, सण आणि धार्मिक कार्यक्रमांत आयोजक ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जाते. वास्तविक, शेतकऱ्यांना मदत मिळायलाच हवी, या मागणीसाठी आम्हीही आग्रही आहोत. मात्र, इतर उद्योग उद्धवस्त न करता सर्वसमवेशक आणि संतुलित धोरणांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
आगामी सण उत्सव काळात कृत्रिम फुले सर्वोत्तम पर्याय आहे. या पर्यायावर बंदी आल्यास एेन सणासुदीत मोठा फटका व्यावसायिकांना बसू शकतो. कृत्रिम आणि सिंगल युज प्लास्टिक फुलांमध्ये फरक लक्षात घ्यावा. कारण कृत्रिम फुलांमध्ये कापडाचा वापर देखील होतो. त्या तुलनेत कापड उद्योगावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार केला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे, सचिव सुनील महाले, खजिनदार मंगेश ढगे, संपर्कप्रमुख गणेश मटाले, फ्लॉवर विक्रेते संदीप काबरा, फ्लॉवर डेकोरेटर्स अॅण्ड इव्हेंट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष नाईकवाडे, रुपेश गुप्ता, निता चंडालिया, पंकज वाणी, नितीन जयस्वाल, तौफिक खान, तुषार श्रीवास्तव, अंकुश बोरा यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली आहे. असोसिएशनच्या शिष्टमंडळासह लवकरच त्यांची भेट घेवून याप्रकरणी सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल.
देवयानी फरांदे, आमदार.
आम्हीही शेतकरी कुटुंबातून असल्याने, शेतकरी हित जोपासण्यास आमचे प्राधान्य आहे. बाजारात कापडी फुलांचे प्रमाण अवघे १० ते १२ टक्के आहे. याचा शेतकऱ्यांच्या फुल उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. त्यामुळे बंदीचा फेरविचार व्हावा.
केशव डिंगाेरे, अध्यक्ष, जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन