कृत्रिम फुलांची बाजारपेठ
उत्पादन क्षेत्र : चीन
सर्वाधिक उत्पादन : फुलांच्या माळा, सुटी फुले, पाकळ्या, पाने
उलाढाल : जवळपास शंभर कोटी
कृत्रिम फुलांवरील बंदीमुळे संशोधन, लागवड अन् उत्पादनातही होणार वाढ
शंकर कवडे
पुणे : धार्मिक कार्य असो की सण, समारंभ. या काळात फुलांचे हार, तोरण तसेच आकर्षक सजावट ही ओघाने आलीच. परंपरेनुसार आपल्याकडे प्रत्येक गोष्टींत फुलांचा वापर होत आला आहे. त्या अनुषंगाने शहरात वर्षभरात कृत्रिम फुलांसह खर्या फुलांची जवळपास सरासरी 300 कोटी रुपयांची उलाढाल होते. यामध्ये खर्या फुलांचा वाटा दोनशे कोटी, तर कृत्रिम फुलांचा वाटा शंभर कोटी इतका असतो. मात्र, यंदा राज्य शासनाने आठवडाभरात कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, साहजिकच कृत्रिम फुलांचा खरेदीदार खर्या फुलांकडे वळणार आहे. परिणामी, येत्या काळात फुलांच्या मागणीसह दरातही वाढ होऊन फूल उत्पादक शेतकर्यांना यंदाच्या वर्षापासून 100 कोटींहून अधिक रुपयांची अतिरिक्त पुष्पभेट मिळणार आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजार हे पुणेकरांचे खरेदीचे हक्काचे ठिकाण. दरवर्षी सणासुदीच्या काळात गजबजणार्या या बाजारात जिल्ह्याच्या विविध भागांतून फुला-पानांची आवक होते. पुणे शहरालगतच्या बहुतांश गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. यामध्ये झेंडू, अॅस्टर, शेवंती, गुलछडी यांसह जर्बेरा, डच गुलाब, कार्नेशियन आदी फुलांचा समावेश आहे. साधारणत: दहा ते पंधरा वर्षांपूर्वी या भागातील तरुण शेतकर्यांनी कृषी विद्यापीठातून शिक्षण घेत पॉलिहाऊसची उभारणी करत जर्बेराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने अन्य फुलांमध्ये संशोधन होऊन नवीन वाण विकसित झाले आणि त्याचेही उत्पादनही होऊ लागले.
मात्र, त्यानंतर शहरात कृत्रिम फुलांचा शिरकाव झाला अन् प्लास्टिक, कापडी, कागदी फुलांनी बाजार कवेत घेतला. खर्या फुलांच्या तुलनेत स्वस्त आणि टिकाऊ असल्याने कृत्रिम फुलांकडे सजावटकारांनी मोर्चा वळविला. मागणी अभावी फुलांचा खर्चही निघेनासा झाला. त्यामुळे, फुलशेती कमी होऊ लागली. कृत्रिम फुले येण्यापूर्वीचा विचार केल्यास बाजारात पूर्वी शोभिवंत फुलांना चांगली मागणी होती. मात्र, कृत्रिम फुलांच्या शिरकावानंतर त्यामध्ये जवळपास निम्म्याने घट झाल्याचे सांगण्यात आले. त्यापाठोपाठ, झेंडू, शेवंतीच्याही माळा येऊ लागल्याने त्याचा मोठा फटका बसला. येत्या काळात फुलाविषयी कोणतीच आशा निर्माण न झाल्याने त्यामधील संशोधनही थांबले. मात्र, राज्य सरकारने आता कृत्रिम फुलांविरोधात कडक पाऊले उचलण्याचा निर्णय जाहीर केल्याने राज्य शासनाने शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे. त्यामुळे, येत्या काळात सणासुदीत फुलबाजार पुन्हा बहरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बाजाराच्या ढोबळ सर्वेक्षणानुसार, बाजारात 40 टक्के फुले प्लास्टिक, दहा टक्के कापड, जाड कागद, सॅटीन, लोकर आदींपासून तयार केलेली, तर उर्वरित 50 टक्के फुले नैसर्गिक दिसून येतात. यामध्ये शोभिवंत असलेली जर्बेरा, गुलाब, कार्नेशियन यांपासून सुट्या स्वरूपात मिळणार्या झेंडू, गुलछडी, शेवंती आदी कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. याखेरीज उर्वरित फुले ही कापड, लोकर आदी कृत्रिम साहित्यांपासून तयार केलेली आढळत आहेत. कृत्रिम फुलांचे प्रमाण निम्म्यावर गेल्याने खर्या फुलांच्या मागणीतही निम्म्याने घट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
कृत्रिम फुलांमुळे ताज्या फुलांचा बाजार कोमेजत आहे. दहा वर्षांत विशेषत: कृत्रिम फुलांनी बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर काबीज केली आहे. फुलांच्या मिळणार्या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरीवर्ग अन्य पर्यायांचा विचार करू लागला होता. मात्र, राज्य सरकार कृत्रिम फूलबंदीचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने फूल उत्पादक शेतकरी पुन्हा फुलांकडे वळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील जवळपास 15 ते 20 हजार शेतकरी विक्रीसाठी पाठवितात फुले
गुलटेकडी मार्केट यार्डात 42 हून अधिक प्रकारच्या पानाफुलांची आवक
शेतकरी, व्यापारी, अडतदार, खरेदीदार, हमाल आदी घटकांचे अवलंबित्व
बाजार समितीला दरवर्षी सरासरी दोन कोटी रुपयांचे सेसरूपी उत्पन्न
फुलांच्या लागवडीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने तरुणाई फुलशेतीकडे वळत नव्हती. जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी एकमेव याच कारणावरून उत्पादन कमी केले. शासनाच्या निर्णयामुळे फूल उत्पादनात नवीन क्रांती निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयानंतर परिस्थिती बदलेल, अशी आशा आहे. शासनाने फुला उत्पादनासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
आप्पा गोराडे, शेतकरी, यवत
कृत्रिम फुलांच्या शिरकाव्यानंतर शोभिवंत फुलांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यापाठोपाठ झेंडू, गुलछडी, शेवंतीच्या फुलांसारख्या माळाही आल्याने या फुलांनाही मोठा फटका बसत आला आहे. कृत्रिम फुलांवरील बंदीच्या निर्णयामुळे परिस्थिती नक्कीच बदलेल, या दुमत नाही. कारण, कृत्रिम फुलांमुळे उत्पादन निम्म्याने घटले होते. ते आत्ता पूर्वपदावर येऊन शेतकर्यांपासून विक्रेत्यांपर्यंत सर्वांना त्याचा फायदा होणार आहे.
सागर भोसले, अडतदार व समन्वयक, पुणे फुलबाजार अडते असोसिएशन