

नाशिक : मकरसंक्रांतीनिमित्त येथील गोदावरी नदीतील रामकुंडात स्नानासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. त्यामुळे सकाळपासूनच गोदाकाठ भाविकांचा गर्दीने फुलला होता. स्नानासोबतच पूजाअर्चा करीत तेथील देवी-देवतांचा मंदिरातील दर्शन घेतले.
मकरसंक्रांत हा हिंदू धर्मातील मराठी सण म्हणून ओळखला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या सूर्य आजच्या दिवसापासून मकर राशीत प्रवेश करण्यास प्रारंभ करतो. तो हळूहळू उत्तरायणाकडे सरकत असतो. मात्र, पूर्वपरंपरागत रिवाजानुसार मकरसंक्रांती हा सण म्हणून मानत आले आहेत. त्याचे पावित्र्य आजही नवी पिढी जपत आहेत.
मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ, हळद व सुगंधी उटणे बनवून ते पाण्यात टाकून आंघोळ केली जाते. त्याला विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच तिळगूळ तयार करून आप्तेष्ट मित्रांना वाटप करीत वर्षभरात काही झालेल्या चुका व त्यातून दुखावलेले मन, यामुळे निर्माण झालेले कटुत्व विसरून तिळगूळप्रमाणे गोड राहण्याचा व गोडवा टिकविण्याचा संदेश दिला जात असल्याचे सांगितले जाते. त्यासोबतच वर्षभरात झालेल्या चुका व पाप कमी व्हावे, म्हणून धार्मिक स्थळी असलेल्या नदीत जाऊन स्नान केल्यास पाप धुतले जाते, अशीही श्रद्धा आहे.
त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन अबालवृद्ध स्नान करून देवदर्शन घेतात. तर दुसरे कारण शारीरिक व्याधीशी जोडले जाते. त्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी तीर्थस्थळी असलेल्या ठिकाणी स्नान केल्यास त्वचारोग कमी होऊन वेदना दूर होतात, असे सांगितले जाते. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी तीर्थस्थळी नदी-नाले किंवा कुंडावर जाऊन आंघोळ करण्याची प्रथा आहे.
त्यामुळे आजच्या मकरसंक्रांतीचे पावन पर्व साधत हजारो महिला-पुरुष, तरुण-तरुणींनी व वृद्धांनी गोदावरीत जाऊन स्नान केले. तसेच काहींनी तेथे असलेल्या रामकुंडामध्ये स्नान करून आपली श्रद्धा व धार्मिक पावित्र्य जपले. त्यामुळे बुधवारी पहाटेपासूनच गोदातीरी भाविकांची गर्दी झाली होती. तो परिसर आबालवृद्धांच्या गर्दीने फुलला होता. तेथील मंदिरांमध्येही गर्दी झाली होती. पुरोहितांकडून पूजाविधी करण्यासाठी नंबर लागले होते.