नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मी त्यांच्यावर काही बोलणार नाही, पण सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. प्रामाणिक लोक सोबत आहेत. मी कुणाची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही. दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचे असते, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या बबनराव घोलप यांना लगावला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी जळगावला रवाना होण्यापूर्वी गुरुवारी (दि.१५) माध्यमांशी संवाद साधला. घोलप यांनी ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते येत्या दोन दिवसांत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. सामान्य नागरिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. प्रामाणिक लोक आमच्यासोबत आहे. जेवढे तेवढेच महत्त्व द्यायचं असते, असा टोला लगावत, घोलप यांच्या बंडाकडे दुर्लक्ष केले.
एकंदर वातावरण सगळीकडे चांगले आहे. सगळ्यांना हेच पाहिजे की, महाराष्ट्र हिताचे कोणी बोलणारे हवे. त्यासाठी आमच्या सभांना गर्दी होत आहे. लोक आशीर्वाद द्यायला येत आहेत, असे त्यांनी सांगितले. आमचा प्रयत्न हाच आहे की, दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही. आपण सारे जण सगळीकडे अस्थिरता पाहत आहोत. प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे. भाजपप्रणीत राज्यात अस्थिरता आहे. आम्हाला महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायचे आहे. महाविकास आघाडीत चांगले काम सुरू होते. तेच काम आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले.
'दिल खोलो और बात करो'
दिल्लीतील शेतकरी आंदोलन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे सांगत दिल्ली बंद करण्यापेक्षा 'दिल खोलो और बात करो', असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला. देशाच्या बाॅर्डरवर जसे खिळे लावले आहेत. तसेच दिल्लीला लावण्यात आले आहेत. ते कोणाविरुद्ध तर, अन्नदात्याविरुद्ध. अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होत्या तेव्हा त्यांनी सांगितले की, चार महत्त्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार आहे. प्रत्येक वर्ग सरकारवर नाराज आहे. मग तुम्ही १० वर्षे नेमके केले तरी काय, असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा :