देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळा ; पुढारी वृत्तसेवा : पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून एकूण १० लाख ६० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यानंतर आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा येथे घातलेल्या पथकाच्या कारवाईने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित बातम्या 

पोलीस अधीक्षक यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने दिलेली माहिती अशी की, देवळा सटाणा रस्त्यावरील माळवाडी शिवारात अवैद्यरित्या सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर सोमवारी (दि. ४ ) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. याठिकाणी जवळपास अठरा लोक मटका खेळताना आढळून आले. यातील मटका चालक नागेश लक्ष्मण जंगम ( वय ४२, रा. धोडंबे हल्ली रा. वडनेर भैरव ता. चांदवड जि. नाशिक ) हा स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी मटका जुगाराचा धंदा करत होता.

यावेळी सदर मटका चालक नागेश यांची झाडाझडती घेऊन रोख रक्कम व मोबाईल फोन असे १ लाख ४० हजार ४५० रुपये जप्त करण्यात आले. तसेच सदर घटनास्थळावर लावण्यात आलेल्या २२ मोटार सायकल एकूण किंमत ९ लाख २० हजार रुपये व मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १० लाख ६० हजार ४५० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. तर नागेश याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वच अवैद्य बंद होते. त्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर पुन्हा हे अवैद्य धंदे सुरू झाल्याची चर्चा आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला मटका व अवैद्य गावठी दारू तसेच रस्त्यांवरील धाब्यावर सुरू असलेला देशी -विदेशी दारू विक्री व्यवसाय पुन्हा सर्रासपणे सुरू झाल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून, अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अधिक तपास पोउनि काळे करीत आहेत.

Back to top button