Nashik News : मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश

Nashik News : मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बस अपघातात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या पंचवटी विभागातील मिरची हॉटेल लगतच्या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी भाजपचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नांदूर नाका पाठोपाठ मिरची हॉटेललगतच्या चौकातही ५० कोटींचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही उड्डाणपुलांमुळे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून, अपघातांना आळा बसणार आहे.

पंचवटीत छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची हॉटेल लगतच्या चौकात ८ आॅक्टोबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या बस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेसह जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेला दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व नाशिक महापालिकेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात शहरात २६ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळले होते. ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी उपाययोजना सूचविताना संभाजीनगर महामार्गावर मिरची चौक, सिध्देश्वर चौक तसेच नांदूरनाका परिसरात उड्डाणपूल उभारण्याची शिफारस केली होती. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला होता. दरम्यान, या अपघातानंतर आ. ढिकले यांनी तातडीने मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला. त्यातूनच सुरूवातीला नांदूरनाका चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी ५० कोटींची तरतूद केली होती. पाठोपाठ नागपूर विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुधारीत पुरवणी मागणीपत्रात मिरची चौकातील उड्डाणपुलालाही मान्यता मिळाली.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नांदुर नाका चौक व मिरची चौक या भागातील वाढते अपघात, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलांची गरज आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर निधी मंजूर झाला आहे.

– अॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news