नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दि नाशिक मर्चन्ट्स बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२४) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.२५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. बँकेचे एकुण १ लाख ८८ हजार ६३८ मतदार असून, त्यांच्यासाठी ९९ ठिकाणी एकुण ३२४ मतदान केंद्राची रचना केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फयासज मुलानी यांनी दिली.
नाशिक शहरात १५५ मतदान केंद्रावर ९० हजार ९१६ मतदार आहेत. तर नाशिक जिल्ह्यात (ग्रामीण) १४४ मतदान केंद्रावर ८२ हजार ८९३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नाशिक जिल्ह्याबाहेर मुंबई, पुणे, चाकण, संभाजीनगर, जालना, वैजापूर, जळगाव, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार, अहमदनगर, श्रीरामपूर, राहता, संगमनेर इत्यादी ठिकाणी २० मतदान केंद्रावर १३ हजार ७८७ मतदार आहेत. तर राज्याबाहेर सुरत व हैदराबाद येथे प्रत्येकी एक व दोन मतदान केेंद्राची रचना करण्यात आली आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रात समाविष्ट गावे याबाबतची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मतदानासाठी अडीच हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. दरम्यान, पाथर्डी फाटा येथील श्री छत्रपती संभाजी महाराज इनडोअर स्टेडियम येथे १०८ टेबलवर मतमोजणी केली जाणार असल्याचेही मुलाणी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :