लेवून नवा साज, सजली साडी खास!
पुणे : साडी, अर्थात महिलांसाठी हळवा कोपरा! साड्यांची खरेदी म्हणजे उत्साहाची परिसीमाच! महिलांची जिवलग सखी असलेल्या साड्यांमध्ये सध्या पैठणी, कांजीवरम, गधवाल सिल्कसह हँडपेंटेंड साड्यांचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. 'जुनं ते सोनं' या उक्तीनुसार साड्यांमधील जुन्या फॅशन नवा साज घेऊन पुन्हा बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या आहेत.
दरवर्षी 21 डिसेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय साडी दिन' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक साडीमागे काहीतरी कथा, जिव्हाळा, आठवण दडलेली असते. केवळ भारतीय महिलांनाच नव्हे तर परदेशातील महिलांनाही साडी या पारंपरिक पोशाखाने भुरळ घातली आहे. त्यामुळेच भारतातील विविध प्रांतांची खासियत असलेल्या साड्या 'लोकल ते ग्लोबल' असा भाव खात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहेत.
आजकाल पारंपरिक साड्यांसह शिवून घेतलेल्या रेडिमेड सहावारी, नऊवारी रेडी टू वेअर साड्यांचीही मागणी वाढली आहे. साडी ड्रेपिंग करून घेण्याचा ट्रेंड लोकप्रिय आहे. साड्यांसह ब्लाऊज हाही ट्रेंडिग विषय आहे. रेडिमेड ब्लाऊजने सध्या क्रांती आणली आहे. महिलांना हव्या तशा डिझाईनचे, आकाराचे, फॅशनचे रेडिमेड ब्लाऊज सहज उपलब्ध झाले आहेत.
एका साडीची किंमत दोन लाखांपासून पुढे!
ऑल ओव्हर अर्थात् अंगभर डिझाईन असलेल्या व हाताने विणलेल्या साड्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अशा पद्धतीची एक साडी बनवायला दहा ते बारा महिने लागतात. यामध्ये ट्रेस पेपरवर डिझाईन काढले जाते. त्यानंतर आठ हजार धाग्यांवर ट्रेस पेपर जोडला जातो. विविधरंगी रिळांच्या साहाय्याने नक्षीकाम केले जाते. एका वेळी 100 रिळे वापरली जातात. एका विणकराने दररोज दहा तास काम केल्यास एक साडी तयार व्हायला बारा महिने आणि रोज दोन विणकर दहा तास बसल्यास आठ महिने लागतात. यामध्ये पेस्टल शेडना जास्त मागणी असते. या साड्यांची किंमत दोन लाख रुपयांपासून सुरू होते.
सध्या कांजीवरम्, कॉटन सिल्क, तवा पल्लू, चंद्रकोर बिट्टी, टेंपल बॉर्डर, ब्रोकेट अशा प्रकारांना आणि डिझाईनना मोठी मागणी आहे. शंभर ते पाचशे वर्षांपूवीच्या डिझाईन पुन्हा फॅशनमध्ये आल्या आहेत. बनारस, वन ग्रॅम जरी, प्युअर जरी असलेली पैठणी अशा साड्या तीन ते चार पिढ्या टिकतात. त्यातून साड्यांचा देखणा वारसा जपला जातो. आजकाल मुली आईच्या, आजीच्या लग्नातील साडी स्वत:च्या लग्नात नेसणे पसंत करतात.
– सोनाली कुद्रे, संचालिका, मुकुंद हँडलूम पैठणी
हँडपेंटेड साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्राजक्त फुलांचा सडा असलेली साडी महिलांना अगदी आपलीशी वाटते. या साडीची किंमत साडेतीन हजारांपासून पुढे आहे. भारताची शिल्पसंस्कृती पदरावर, साडीवर उतरवण्याची साडी व्यवसायातील माझ्या एका मैत्रिणीची खासियत आहे. हँडपेंटेड साड्यांची किंमत पंधरा हजारांच्या पुढे असते. काही मैत्रिणी प्लेन साड्या विकत घेतात आणि आपल्या आवडीचे डिझाईन पेंट करून घेतात. सोशल मीडियामुळे साड्यांच्या ट्रेंडबाबत जागरुकता आली आहे. त्यामुळे घरबसल्या कोणत्याही प्रांतातील साड्या खरेदी करणे शक्य झाले आहे. कलमकारी, इरकल पॅचवर्कच्या साड्यांना मागणी आहे.
– गौरी ब्रह्मे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर
हेही वाचा