

Guardian Minister of Nashik District
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नसतानाच राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)चे मंत्री छगन भुजबळ, शिंदे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी यंदा ध्वजारोहणासाठी आग्रह धरल्याने पेच निर्माण झाला होता. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला कोण ध्वजारोहण करणार यावरून प्रश्न उपस्थित झाला होता.
परंतु आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील खास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. तसे परिपत्रक शासनाने काढले आहे. यामुळे मंत्री भुसे, भुजबळ यांना मंत्री महाजन पुन्हा भारी पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करतील. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले तरी पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. मंत्री महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद दिल्यानंतर शिवसेना (शिंदे) गटाने नाराजी व्यक्त केली होती. भुसेंना डावलण्यात आल्याने शिंदे गट नाराज होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसोबतच रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. त्यानंतर अजूनही पालकमंत्री नियुक्त करण्यात आलेला नाही.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे तीन मंत्री आहेत व शिवसेनेचा एक मंत्री आहे. शिवाय जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने राष्ट्रवादीने सुरुवातीपासून पालकमंत्रिपदावर दावा ठेवला आहे. यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेदेखील मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीचे तीन मंत्री जिल्ह्यात असल्याने ध्वजारोहणाचा मान छगन भुजबळ यांनाच मिळावा, अशी मागणी सुरू झाली होती. याशिवाय १५ ऑगस्टला झेंडा फडकविण्यासाठी शिवसेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू होती. शिंदेसेनेचे भुसे यांचाही नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा आहे. यापूर्वी झालेल्या 26 जानेवारी व 1 मे महाराष्ट्र दिन रोजीचा ध्वजारोहणाचा मान हा मंत्री महाजन यांना देण्यात आला होता. आता मात्र राष्ट्रवादीचे तीन मंत्री असल्याने हा मान राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी सुरू झाली होती. यात मंत्री भुजबळ यांना हा मान मिळावा, अशी मागणीदेखील झाली होती. तर, मंत्री भुसे यांना ही मान मिळावा यासाठी शिवसेना आग्रही झाली होती. त्यामुळे ध्वजारोहणाचा मान कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पेच सोडवत, मंत्री महाजन यांना पसंती दिली आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांच्याच हस्ते नाशिकला ध्वजारोहण होणार आहे.
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा असल्याने पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांचा पालकमंत्रिपदावर दावा आहे. मंत्री महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. असे असताना नाशिकचे पालकत्व नक्की कुणाच्या पदरात पडते ते पाहावे लागणार आहे. परंतु आठ महिन्यांपासून या संदर्भातील काय तो निर्णय झालेला नाही. अशात मंत्री महाजन यांनाच पुन्हा ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने पालकमंत्रिपदही भाजप स्वतःकडेच ठेवेल असे संकेत मिळत आहेत.