नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
डॉ. वसंतराव पवार यांचे निधन हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा पराभव होता. त्या पराभवापेक्षा कोणताही पराभव मोठा असू शकत नाही. त्यामुळे मविप्र संस्थेच्या निवडणुकीत झालेला पराभव क्लेशदायक नाही किंवा खचून जाण्याचा प्रश्नच नाही. मविप्र संस्थेच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.
प्रगती पॅनलच्या वतीने सभासदांचे आभार मानण्यासाठी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. पिंपळगाव बसवंत येथे सभासदांचे आभार व्यक्त करताना नीलिमा पवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद पंढरीनाथ देशमाने होते. मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब महाले, दिलीपराव मोरे, माणिकराव शिंदे, सचिन पिंगळे, भास्करराव बनकर, अरुण मोरे, साहेबराव मोरे, सोमनाथ मोरे आदी उपस्थित होते. पवार म्हणाल्या, मविप्र संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असून सत्तेवर आलेले संचालक मंडळ चुकीची माहिती देऊन सभासदांची दिशाभूल करत आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नका तसेच यापुढील काळात सर्वसाधारण सभा व इतर माध्यमातूनसुद्धा आपण सत्ताधारी गटाच्या कारभारावर अंकुश ठेवणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. भास्करराव बनकर यांनी, सभासदांचे व संस्थेचे हित हेच ध्येय समोर ठेवून मविप्र संस्थेची प्रगती साधूनही राजकीय हस्तक्षेपामुळे प्रगती पॅनलचा पराभव झाला. मात्र, सत्ताधारी गटाच्या कारभारावर नजर ठेवण्याबरोबरच प्रगती पॅनल आजपासून सक्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी दिलीपराव मोरे, शिवाजीराव निरगुडे, सोमनाथ मोरे, पी. आर. मोरे, उद्धव निरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनील ढिकले यांची मविप्रच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंगला जाधव, अविनाश देशमाने, अरविंद जाधव, मनोज मोरे, चंद्रकांत कुशारे, हेमंत बोरस्ते, अभिजित जाधव, रामराव मोरे आदींसह सभासद उपस्थित होते. चंद्रकांत कुशारे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता गडाख यांनी आभार मानले.